FDA directives : रक्तकेंद्रांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश
,
मुंबई :
रक्तसुरक्षा, गुणवत्ता, रुग्ण व रक्तदात्यांच्या हितसंरक्षणासाठी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नियम, १९४५ मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व परवानाधारक रक्तकेंद्र व रक्तसाठवणूक केंद्रांना दिले आहेत. यामध्ये रक्तसंकलन, रक्त किंवा रक्तघटक वितरित करण्यासाबाबत स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करत त्याचे पालन करण्याचे निर्देश एफडीएने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तकेंद्रांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
मानवी रक्त व त्याचे घटक हे औषधे व प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत ‘औषध’ म्हणून अधिसूचित आहे. त्यामुळे कोणतेही रक्तकेंद्र किंवा संस्था वैध परवान्या शिवाय रक्त संकलन, प्रक्रिया, साठवण अथवा वितरण करू शकत नाही. तसेच प्रत्येक रक्तकेंद्राने औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ मधील अनुसूची ‘एफ’ भाग १२-बीमधील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र एफडीएमार्फत राज्यातील रक्तकेंद्रांच्या केलेल्या तपासण्यांमध्ये काही रक्तकेंद्रांकडून या अटींचे पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफडीएने हा आदेश जारी केला आहे.
हेही वाचा : Medical Admission : वैद्यकीय व दंत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
एफडीएने जारी केलेल्या या आदेशमध्ये स्पष्टपणे जाहीर केलेल्या कार्यपद्धतीमध्ये अनुसूची ‘एफ’ भाग १२-बी नुसार प्रत्यके रक्तकेंद्रामध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, समुपदेशन कक्ष, गुणवत्ता नियंत्रण विभाग व रक्तघटक प्रक्रिया सुविधा उपलब्ध असणे, नियमांनुसार पात्र वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचारिका व समुपदेशकांची नियुक्ती करणे, प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, सिफिलिस व हिवताप या तपसाण्या करणे, रक्त व रक्तघटकांची योग्य तापमानात साठवण, कोल्ड चेन राखणे व संशयित रक्तपिशव्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवणे, रक्तपिशव्यांचे नियमानुसार लेबलिंग, नोंदींचे विहित कालावधीसाठी जतन व रक्तघटक निर्मितीसाठी विहित कार्यपद्धतींचे पालन करणे, प्रत्येक रक्तकेंद्राने नियमित स्वयं-अनुपालन तपासणी करणे, रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे, आपत्कालीन सुविधा, रक्तवाहतूक व शिबिरानंतरची अहवाल प्रणाली निश्चित करणे, ई-रक्तकोश पोर्टलवर रक्तसाठा व संबंधित माहिती दररोज अद्ययावत करणे आणि २०२० मध्ये सुधारित रक्तदाता निवड निकष व तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी अपात्रतेचे निकष काटेकोरपणे लागू करण्याबाबत एफडीएने निर्देश दिले आहेत.
FDA directives : रक्तकेंद्रांना कार्यपद्धतीचा आढावा घेण्याचे आदेश
राज्यातील सर्व रक्तकेंद्राना तात्काळ त्यांच्या विद्यमान कार्यपद्धतींचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे या आदेशाद्वारे निर्देश दिले आहेत. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या रक्तकेंद्राविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई घेण्यात येणार आहे.
रक्त ही रुग्णाची मूलभूत गरज आहे. प्रत्येक रुग्णाला सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह रक्त व रक्तघटक मिळणे हक्क आहे. या सर्वसमावेशक आदेशाद्वारे राज्यातील सर्व रक्तकेंद्रामध्ये एकसमान दर्जा, पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण आणि कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व परवानाधारक रक्तकेंद्रानी या आदेशाची अंमलबजावणी करावी.
-तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए



