J.J.Hospital : जे. जे. रुग्णालयात एमआरआयसाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा

आश्वासनानंतरही दुसऱ्या एमआरआय यंत्र मिळण्यास विलंब

मुंबई :

जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे दोन ते तीन हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील अनेक रुग्णांच्या निदानासाठी एमआरआय काढण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. मात्र जे.जे. रुग्णालयामध्ये फक्त एकच एमआरआय यंत्र असल्याने रुग्णांना साधारणपणे दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. परिणामी रुग्णांना खासगी केंद्रांमधून एमआरआय करावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रुग्णालयामध्ये आणखी एक यंत्र बसवण्याबाबत आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जे. जे. रुग्णालयामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. यातील अनेक रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असतात. या रुग्णांना सरकारी रुग्णालयातील मोफत किंवा उपलब्ध औषधांचा मोठा आधार असतो. जे.जे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज जवळपास अडीच ते तीन हजार रुग्ण उपचारासाठी येत असताना त्या तुलनेत रुग्णालयामधील डाॅक्टर, वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांची संख्या ही फारच अपुरी आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असतो. जे.जे. रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून एकच एमआरआय यंत्र कार्यरत आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आजारांच्या निदानासाठी एमआरआयसाठी भल्या मोठ्या प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत आहे. एमआरआय करण्यासाठी दीड ते दोन महिने प्रतीक्षा यादी असल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जे.जे. रुग्णालयात राज्यातून रुग्ण येत असल्याने त्यांना तेथे राहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असते. त्यातच एमआरआयसाठी दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा यादी असल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खासगी केंद्रातून एमआरआय करून घ्यावे लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

J.J.Hospital : आश्वासनानंतर फक्त एकच यंत्र सुरू

एमआरआय तपासणीला होणारा विलंब थेट रुग्णांच्या निदान आणि पुढील उपचारांवर परिणाम करणारा ठरत आहे. गंभीर आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणीसाठी रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या बैठकीमध्ये जे. जे. रुग्णालयात दोन एमआरआय मशीन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येतील. जेणेकरून रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र या आश्वासनानंतर फक्त एकच यंत्र सुरू करण्यात आल्याची टीका आमदार अमीन पटेल यांनी केली आहे. आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच आणखी एक एमआरआय यंत्र तातडीने सुरू करण्याची मागणी अमीन पटेल यांनी केली आहे.

एमआरआय काढण्यासाठी सध्या एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे. मात्र गंभीर रुग्णांचा एमआरआय तातडीने काढण्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच अन्य एक एमआरआय यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
– डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

हेही वाचा : CCMP : सीसीएमपी धारकांची एमएमसीमध्ये नोंदणी सुरु; आयएमएचा विरोध

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत