Teacher Recruitment : पवित्र पोर्टलमधून साडेचार हजार क्रीडा शिक्षकांची पदे गायब

४ हजार ८६० क्रीडा शिक्षकांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश करा - शिक्षक महासंघ अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण विभागाकडे मागणी

मुंबई : 

राज्यात ३० हजारांवर शिक्षक पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. मात्र, या भरतीत साडेचार हजारांवर क्रीडा शिक्षकांची पदेच गायब करण्यात आली आहेत. त्यामुळे बी.पी.एड. धारकांची घोर निराशा झाली असून क्रीडा शिक्षकांच्या चार हजार 860 पदांचा देखील पवित्र पोर्टलमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या 2 जानेवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार राज्यात क्रीडा शिक्षकांची 4860 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. एकीकडे २०२५ च्या अभियोग्यता परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी गुरुवारी पोर्टलवर एकंदर ३० हजार २०९ रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. परंतु, या ३० हजार पदांमध्ये एकही क्रीडा शिक्षकाचे पद जाहीर करण्यात आलेले नाही.

Teacher Recruitment : ४ हजार ८६० केंद्रीय शाळांवर प्रत्येक एक क्रीडा शिक्षक मंजूर

राज्यात सर्व जि. प. च्या स्तरावर एकंदर ४ हजार ८६० केंद्रीय शाळांवर प्रत्येक एक क्रीडा शिक्षकही मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्यात बी.पी.एड. झालेले उमेदवार अनेक वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी अभियोग्यता चाचणीही दिलेली आहे. मात्र, गुरुवारी पवित्र पोर्टलवरून भरतीसाठी जाहीर झालेल्या पदांमध्ये क्रीडा शिक्षक पदांचा समावेशच करण्यात आला नाही. त्यामुळे या उमेदवारांची घोर निराशा झाली असून तातडीने या 4860 पदांचा देखील समावेश पवित्र पोर्टलमध्ये करण्यात यावा अशी मागणी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाच्या वतीने करण्यात आली असल्याचे शिक्षक महासंघाचे मुंबई कार्याध्यक्ष सुभाष अंभोरे उपाध्यक्ष विजय धनवडे कोकण विभाग कार्याध्यक्ष संपत गीते मुंबई उत्तर विभाग अध्यक्ष अवधूत चव्हाण दक्षिण विभाग अध्यक्ष सचिन पांडे पश्चिम विभाग अध्यक्ष सुनील सानप उपाध्यक्ष प्रवीण पाटील योगीराज गावडे यांनी सांगितले.

हेही वाचा : विनायक निम्हण State Carrom : अभिजित, झैद उपांत्य फेरीत दाखल

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत