Tukaram mundhe : गोवंडीमध्ये रुग्णालयामध्ये विनापरवाना औषधांची विक्री

एफडीए तुकाराम मुंढे यांनी रुग्णालयावर केली कारवाई

मुंबई :

गोवंडीमध्ये विनापरवानगी औषधांची विक्री करणाऱ्या मुस्कान एनआयसीयू ॲंड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये रुग्णालयातील दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये ९ लाख ९ हजारांचा ॲलोपॅथिक औषधांचा साठा आढळून आला. या रुग्णालयामध्ये या औषधांची विक्री फार्मासिस्टऐवजी इयत्ता १२ वी उत्तीर्ण रिसेप्शनिस्टमार्फत विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गोवंडीतील लहान मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचे उघडकीस आले आहे.

गोवंडीमध्ये रुग्णालयामध्ये विनापरवाना औषधांची विक्री - voice of eastern
गोवंडीमध्ये रुग्णालयामध्ये विनापरवाना औषधांची विक्री

नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तसेच औषधांची सुरक्षित, कायदेशीर व नियमनबद्ध विक्री सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गोवंडी पूर्वेकडील शिवाजीनगरमधील प्लॉट क्रमांक ४४ रोड क्रमांक ३ वरील मुस्कान एनआयसीयू ॲंड चिल्ड्रन हॉस्पिटलची तपासणी व चौकशी केली. या तपासणीमध्ये रुग्णालयाचे संचालक डॉ. निलेश शाह यांनी रुग्णालयातील दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधांचा साठा करून ठेवलेला आढळून आला. या औषधांची विक्रीबाबत कोणताही परवाना संचालकांकडे नव्हता. रुग्णांना काउंटरवरून औषधांची विक्री करणे तसेच औषध विक्रीची देयके तयार करणे यासाठी आवश्यक तांत्रिक पात्रता किंवा फार्मसी व्यवसायाशी संबंधित वैधानिक पात्रता नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. ही व्यक्ती इयत्ता १२ वी उत्तीर्ण असून, रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम करत होता.

Tukaram mundhe : देयकांवर कोणताही तपशील नमूद नव्हता

कारवाईदरम्यान रुग्णांना औषधे विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे देयके बुक जप्त करण्यात आले. तसेच संबंधित देयकांमध्ये केवळ रुग्णाचे नाव, दिनांक, औषधाचे नाव आणि आकारलेली रक्कम यांचा उल्लेख करण्यात आला होता. तथापि, औषधांच्या बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, मुदत समाप्ती दिनांक, उत्पादकाचे नाव तसेच इतर आवश्यक वैधानिक तपशील नमूद करण्यात आलेले नव्हते. ही बाब ग्राहक संरक्षण तसेच औषध विक्रीसंदर्भातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचे आढळून आले.

Tukaram mundhe :  ९ लाखांचा साठा जप्त

मुस्कान एनआयसीयू ॲंड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला ९ लाख ९ हजार रुपये किमतीचा ॲलोपॅथिक औषधसाठा जप्त करण्यात आला. पुढील तपास पूर्ण करून सर्व संबंधितांविरुद्ध औषधे व प्रसाधने अधिनियम, १९४० व त्याअंतर्गत नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड अन्न व औषध प्रशासन सहन करणार नाही. वैध परवान्याविना औषधांची विक्री, अपात्र व्यक्तींमार्फत औषध वितरण तसेच औषध विक्रीसंदर्भातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी औषधे केवळ परवानाधारक औषध विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत आणि प्रत्येक खरेदीवेळी वैधानिक तपशील असलेले देयके घेण्याची दक्षता घ्यावी.
– तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए

हेही वाचा :  Jaslok Hospital: रोबोटिक तंत्रज्ञानाने गुदाशयाचा कर्करोग बरा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत