Skill education : कौशल्य शिक्षण समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत न्यावे : राज्यपाल

मुंबईत एक दिवसीय स्टार्टअप महोत्सव थाटात

मुंबई :

स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, युवक मोठ्या प्रमाणात नवोन्मेषाची कास धरत आहेत. कौशल्य शिक्षण समाजातील ग्रामीण व आदिवासी भातातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्याकडे असलेले पारंपरिक ज्ञान व कौशल्ये देखील उत्पादन व सेवांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. या दृष्टीने कौशल्य विद्यापीठाने गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचावे असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

Skill Education - voice of eastern
मुंबईत एक दिवसीय स्टार्टअप महोत्सव थाटात

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व विद्यापीठ प्रणित आय स्पार्क फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘स्टार्ट-अप फ्रंटियर १.०’ या एक दिवसाच्या स्टार्टअप महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारतात कल्पकता आणि नवोपक्रमांची कमतरता नाही, मात्र या नवकल्पनांचे समाजोपयोगी उपाययोजना आणि यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. या दृष्टीने ‘स्टार्टअप फ्रंटियर १.०’ सारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. सिंगापूर, इस्रायल आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांकडे विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती नसतानाही त्यांनी मानवी भांडवल, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांच्या बळावर जागतिक प्रगती साधली आहे. भविष्यात विद्यापीठांची ओळख त्यांनी निर्माण केलेल्या नवोपक्रमांवर, बौद्धिक संपदेवर, प्रोत्साहन दिलेल्या स्टार्टअप्सवर आणि समाजावर झालेल्या सकारात्मक परिणामावर ठरेल. विकसित भारताचा अर्थ केवळ आर्थिक समृद्धी नसून सर्वांच्या सर्वांगीण विकासाशी तो जोडलेला आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ या भारतीय तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत सर्वसमावेशक, न्याय्य आणि समान संधी देणारा समाज घडविण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा मंत्र घोषवाक्य केवळ नसून देशाच्या विकासाचे व्यापक ध्येय असल्याचे सांगून राज्यपाल वर्मा म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कौशल्य विकास, उद्योजकता आणि नवोपक्रमांचे लाभ पोहोचले पाहिजेत, असे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सांगितले.

आतापर्यंत विद्यापीठांच्या पदवीला महत्व होते. परंतु भविष्यात विद्यापीठांनी किती नवोन्मेषाला चालना दिली, किती बौद्धिक संपदा निर्माण केली व किती स्टार्टअप्सना पाठबळ दिले व त्या सर्वांचा समाजाला किती उपयोग होत आहे यावरून विद्यापीठाची पत ठरवली जाईल असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एचपी इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

Skill education : प्रत्येक गावापर्यंत स्टार्टअप चळवळ पोहचवणार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्टार्टअप चळवळ ही केवळ काही शहरांपुरती किंवा विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता ती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि समाजाच्या सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील आघाडीचे स्टार्टअप केंद्र बनविण्यासाठी ही चळवळ घराघरात पोहोचविण्याचा शासनाचा निर्धार आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने ६० महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू करून विद्यार्थ्यांना उद्योग, गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आयआयटी मद्राससोबतच्या सामंजस्य करारामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर व ऑपरेशन्स विषयातील प्रमाणित प्रशिक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रातील १५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षत करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा :  Kabaddi: सामनाचे मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत