MSRTC : मध्यवर्ती कार्यालयात अनोळखी व्यक्तीची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हुज्जत
श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी
मुंबई :
स्वतःला कायदे पंडित मानणाऱ्या एका बिनडोक व्यक्तीने आपले अव”गुण” उधळून गोंधळ घालत अधिकाऱ्यांना वेठीस धरल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात घडला. महामंडळाच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर मंगळवार दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात आणि दालनाबाहेर घडलेल्या या गोंधळामुळे अधिकारी व कर्मचारी धास्तावले असून एसटीच्या मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.
एसटीमधील महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने त्याची सखोल चौकशी करावी तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाला भयमुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करावी अशी मागणी केली. गेली अनेक वर्षे पोलिस खात्यातील आय पी एस अधिकारी एस टी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या पदावर होते, पण आता मात्र पद रिक्त आहे हे पद तत्काळ भरण्यात यावे अशीही मागणी या निमित्ताने बरगे यांनी केली तसेच एसटीच्या मुख्यालयात गोंधळ घालणाऱ्या सदर व्यक्तीला प्रवेश बंदी करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.



