Saint George’s Hospital : अनधिकृत झोपड्या हटविल्याने शवागृहाचा मार्ग मोकळा

मुंबई :

दहा महिन्यांपूर्वी नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊनही सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे शवागृह सुरू करण्यात आसपासच्या झोपड्या अडथळा ठरत होत्या. मात्र तब्बल १० महिन्यानंतर या झोपड्या हटविण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले. यामुळे शवागृह सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या शवागृहामध्ये २४ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे मृतदेहांची होणारी हेळसांड व नातेवाईकांची होणारी धावपळ थांबणार आहे.

सेंट जॉर्जेस रुग्णालयातील शवागृह सुरू करण्याचा मार्ग मोकळा voice of eastern
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील शवागृह

सेंट जॉर्जेस रुग्णालयातील शवागृहाच्या नूतनीकरणाचे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाले होते. या नव्याने बांधण्यात आलेल्य शवागृहामध्ये २४ मृतदेह जतन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र या शवागृहाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या काही झोपड्यांमुळे शवागृहातून मृतदेह जतन कक्षामध्ये नेण्यात अडचणी येत होत्या. शवविच्छेदनानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मृतदेह जतन कक्षामध्ये ठेवणे आवश्यक असते. मात्र या झोपड्यांमुळे मृतदेह जतन कक्षात नेणे अशक्य होते. त्यामुळे शवविच्छेदनानंतर मृतदेह जी.टी. रुग्णालय किंवा जे. जे. रुग्णालयातील शवागृहात पाठवण्यात येत होते. परिणामी नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयातून जी.टी. रुग्णालय किंवा जे. जे. रुग्णालयामध्ये हेलपाटे मारावे लागत होते. मृतदेहाची होणारी हेळसांड आणि दुःखाच्या क्षणी नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाकडून शवागृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

ही बाब सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत अनेकदा झोपडीधारकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढली. अखेर १० महिन्यांनंतर झोपडीधारकांनी झोपड्या रिकाम्या केल्या. झोपडीधारकांनी झोपड्या रिकाम्या केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने झोपड्या हटवल्या. २९ जानेवारी रोजी झोपड्या हटवल्याने शवागृहाच्या जतन कक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. या शवागृहामध्ये तब्बल २४ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे.

हेही वाचा : Railway Megablock : तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक

नूतनीकरण करण्यात आलेल्या सेंट जॉर्जेस रुग्णालयातील शवागृहाच्या जतन कक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आता जी.टी. रुग्णालय किंवा जे.जे. रुग्णालयाकडे पाठविण्यात येणारे मृतदेह रुग्णालयाच्याच शवागृहामध्ये ठेवता येणार आहेत. शवागृहामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर तातडीने शवागृहाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *