श्रमिक जिमखान्यावर रंगणार Kabaddiच्या आठवणींची सुवर्ण चढाई

मुंबई –

‘मी श्रमिक, माझी माती साद घालतेय!’ या भावनेसह कबड्डी पंढरी श्रमिक जिमखाना शनिवारी (दि. ११) आपल्या हिरक महोत्सवी सोहळ्यात भूतकाळातील सुवर्ण क्षणांना उजाळा देणार आहे. वरळी कोळीवाड्यातील अमरप्रेम क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवाला आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून भावनिक किनार देताना या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ५ वाजता सुरु होणारा हा सोहळा केवळ कार्यक्रम नसून, कबड्डीच्या मातीत रुजलेल्या संघर्ष, जिद्द आणि आपुलकीच्या नात्यांचा उत्सव ठरणार असल्याचा विश्वास निमंत्रक आणि आमदार सुनील शिंदे यांनी बोलून दाखवला.

हिरक महोत्सवी सोहळा होणार दिमाखदार

गेल्या ६० वर्षांत या श्रमिकच्या लाल मातीने असंख्य चढाया, पकडी आणि थरार अनुभवले. ‘कबड्डी कबड्डी’ म्हणत घेतलेला दम, जिंकण्याचा आनंद आणि पराभवानंतरही पुन्हा उभे राहण्याची जिद्द, हे सारे अजूनही या मातीत जिवंत आहे. म्हणूनच ‘श्रमिक जिमखान्याच्या मातीचा टिळा कबड्डीपटूंच्या माथी लागणार’ ही भावना या सोहळ्याचं सार ठरणार आहे. विशेष म्हणजे कबड्डीच्या खेळाडू, कार्यकर्ते आणि संघटकांच्या घामाने पावन झालेल्या मातीचा कलश कबड्डीच्या दिग्गजांना आठवण म्हणून दिला जाणार आहे. श्रमिक जिमखान्याचा हिरक महोत्सवी सोहळा दिमाखदार आणि न भूतो न भविष्यति असा साकारला जाणार असल्याचा विश्वास कबड्डीप्रेमींनी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच दिला आहे.

Kabaddi पंढरीला बाळासाहेब ठाकरे यांनीही दिली होती भेट

या कबड्डी पंढरीला तीन दशकांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पावले लाभली होती. त्या परंपरेचा मान राखत यंदाच्या हिरक महोत्सवानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.

कबड्डी voice of eastern
कबड्डी

या सोहळ्यात पहिल्या अर्जुनवीर सदानंद शेट्ये यांच्यापासून ते आजच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांपर्यंत अनेक दिग्गजांना मानवंदना दिली जाणार आहे. महिला-पुरुष संघनायक, कबड्डीचा वारसा जपणार्‍या संस्था, तसेच पडद्यामागे राहून मैदान उभारणारे, रेषा आखणारे कार्यकर्ते यांचाही सन्मान केला जाणार आहे.

यंदाच्या सोहळ्याला एक आगळा रंग देत, नेहमीच चढाया करणार्‍या मुंबईच्या रणरागिणी कबड्डीपटू श्रमिक जिमखान्याच्या हीरक महोत्सवानिमित्त रॅम्पवर अनोखी चढाई सादर करणार आहेत. कबड्डीच्या पंढरीला मानाचा मुजरा करत हे सादरीकरण प्रेक्षकांसाठी आठवणींची आणि कबड्डीप्रेमाची खास मेजवानी ठरणार असल्याची माहिती आयोजक अमरप्रेम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राणप्रताप तिवारी यांनी दिली.

हेही वाचा : Mahatma phule: शाळांमध्ये होणार फुलेंच्या विचारांचा जागर

‘श्रमिक जिमखान्यावर आज आठवणींची सुवर्ण चढाई’ या भावनेतून हा सोहळा उलगडणार असून, चार दशकांहून अधिक काळ खेळलेले खेळाडू, प्रशिक्षक, हाडवैद्य, पत्रकार आणि चाहते या सर्वांचा सन्मान म्हणजे कबड्डी कुटुंबाच्या एकजुटीचा हृद्य क्षण ठरेल. ‘कबड्डीसाठी घाम गाळलेल्या खेळाडूंचा, संघटकांचा हृद्य सत्कार’ ही या कार्यक्रमाची खरी ओळख ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *