Civil Engineering : आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा वाढता कल
मुंबई :
आयआयटीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल हा साधारणपणे कॉम्प्युटर सायन्स, आयटी या शाखांकडे अधिक असतो. मात्र यंदाच्या आयआयटी प्रवेश प्रक्रियेमध्ये देशातील प्रमुख आयआयटींमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीकडे (सिव्हिल इंजिनियरिंग) या शाखेला पसंती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशभरात सुरू असलेले महामार्ग, मेट्रो, विमानतळ, बंदरे आणि इतर मोठे पायाभूत विकास प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा याकडे कल वाढत असल्याचे बाेलले जात आहे.
हेही वाचा : WorldSkills Competition: भारतीय वंशाच्या प्रथम लोहियाची निवड
आयआयटी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) ॲडव्हान्स्ड २०२६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा वेगळेच चित्र दिसून येत आहे. आयआयटी मुंबई व आयआयटी दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला पसंती दर्शवली आहे. यंदा अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या शाखेच्या पात्रता गुणांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. गतवर्षी आयआयटी मुंबईमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेसाठी अखिल भारतीय क्रमवारीत २,६६६ क्रमांक असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला होता. मात्र यंदा पात्रता गुणांमध्ये वाढ झाली आहे. यंदा ३८५ क्रमांक असलेल्या विद्यार्थ्याला जागा भरण्यात आली आहे. आयआयटी दिल्लीतही गतवर्षी ३,०३० क्रमांकापर्यंत खुली असलेली ही शाखा यंदा अवघ्या १७९ क्रमांकावर भरली आहे. म्हणजेच या शाखेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आयआयटी मुंबई आणि दिल्लीबरोबरच आयआयटी पटना, रुरकी आणि भुवनेश्वरमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे प्रवेशाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Civil Engineering : पायाभूत विकास प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा कल वाढला
तज्ज्ञांच्या मते, देशभरात सुरू असलेले महामार्ग, मेट्रो, विमानतळ, बंदरे आणि इतर मोठे पायाभूत विकास प्रकल्प यामुळे स्थापत्य अभियंत्यांची गरज वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी मागे पडलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेने यंदा पुन्हा दमदार पुनरागमन केल्याचे आयआयटी प्रवेशाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.
कुठे किती वाढली पसंती?
आयआयटी – प्रवेश क्रमांकातील सुधारणा
भुवनेश्वर – ३,२०४
पटना – २,९७८
दिल्ली – २,८५१
रुरकी – २,४५४
मुंबई – २,२८१


