Teachers Training : नवीन अभ्यासक्रमासाठी मे मध्ये होणार राज्यव्यापी प्रशिक्षण
मुंबई –
राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) मे महिन्यांमध्ये राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा तीन स्तरावर घेण्यात येणार आहे.

Teachers प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर
शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार असल्याने हे प्रशिक्षण त्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन परिषदेकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार मे महिन्यात होणाऱ्या प्रशिक्षणाचे वेळापत्रकही परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्यस्तर प्रशिक्षण ४ ते ७ मे, जिल्हास्तर प्रशिक्षण ११ ते १४ मे आणि तालुकास्तर प्रशिक्षण १८ ते ३० मे दरम्यान होणार आहे. मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षणासाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण आयोजित केले जाणार असून, अन्य माध्यमांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण हे मराठी माध्यमांच्या शिक्षकांसोबत करण्यात येणार आहे उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी राज्यस्त व जिल्हास्तर असे दोनच स्तर होणार असून, मराठी माध्यमाच्या शिक्षकांसाठी तीन स्तरांवर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
Teachers प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित
इयत्ता दुसरीसाठी तीन दिवस, तर तिसरी आणि चौथीसाठी चार दिवस प्रशिक्षण असणार आहे. प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होतील याची काळजी घेत प्रशिक्षण कालावधी निश्चित करताना घेतली आहे.
प्रशिक्षणाची जबाबदारी डाएटकडे
जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डाएट) सोपविण्यात आली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या एकूण शिक्षकांच्या संख्येनुसार ६० शिक्षकांचा गट तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशिक्षण स्थळ, तज्ज्ञांची निवड व अन्य पूर्वतयारी करण्याची जबाबदारी डाएटवर सोपवली आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक घटकसंच व वाचन साहित्य शिक्षकांना डाएटकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४’, इयत्ता तिसरी व चौथीचे पाठ्यक्रम साहित्य शाळांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक
प्रशिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय विद्या प्राधिकरण (रा) आणि डाएट यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी अनुभवी शिक्षक, अभ्यासक्रम निर्मितीतील तज्ज्ञ, व्याख्याते आणि पर्यवेक्षकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
अनुदानित व विनाअनुदानित शाळांसाठी स्वतंत्र तरतूद
शासकीय व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. मात्र, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांना त्यांच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण आयोजित करावे लागणार आहे.



