Ajit Pawr : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; तीन दिवसांचा शासकीय दुखवटा
मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी याबाबत अधिकृत आदेश जारी केले असून, अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुखवट्याच्या काळात राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक इमारती आणि ज्या ठिकाणी नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. “जमिनीशी नाळ असलेला, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेता आपण गमावला आहे. हा धक्का वैयक्तिकदृष्ट्या तसेच महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या अपघातात इतर व्यक्तींचाही मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना, “अजितदादा हे केवळ माझे सहकारी नव्हते, तर मोठ्या भावासारखा आधार होते. त्यांच्या जाण्याने राज्याने एक दूरदर्शी आणि स्पष्टवक्ता नेतृत्व गमावले आहे,” असे म्हटले.
Ajit दादा म्हणजे ‘शब्दाला पक्का नेता’
मंत्री पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना, त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा उल्लेख केला. नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला आहे, अशा शब्दात कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहे. अजितदादा म्हणजे कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर दरारा असलेले व्यक्तिमत्त्व. ‘शब्दाला पक्का नेता’ ही त्यांची ओळख संपूर्ण राज्याला होती. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांची कामे मार्गी लावणारा लोकनेता आपण गमविला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरले आहेत. तर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शेती, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.
हेही वाचा : School Close : राज्यातील शाळांना सुट्टी; विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलली
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकीय, प्रशासकीय आणि विकास प्रक्रियेत मोठी पोकळी निर्माण झाली असून, महाराष्ट्राने एक अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.



