Drugs Free मुंबई उच्चस्तरीय समितीचे नेतृत्त्व लोढांकडे
मुंबई :
गोरेगावमधील नेस्को मैदानावर आयोजित संगीत कार्यक्रमादरम्यान उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर राज्य सरकारने मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी व्यापक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विशेष उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे या समितीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. समितीच्या माध्यमातून मुंबईभर १२ कलमी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक अभियान राबविण्यात येणार आहे.
गोरेगाव येथील घटनेनंतर तरुणांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या विषयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकीत जून २०२६ ते जून २०२७ या कालावधीत वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला. या मोहिमेची सुरुवात २१ जूनपासून होणार असून पहिल्या टप्प्यात घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. जुलै महिन्यात सोशल मीडियावरील रील स्पर्धा, ऑगस्टमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्तीची शपथ, सप्टेंबरमध्ये पथनाट्य सादरीकरण, ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीनिमित्त शहरव्यापी जनजागृती रॅली आयोजित केली जाईल.
यानंतर नोव्हेंबरमध्ये ‘ड्रग-फ्री मुंबई फेस्ट’, डिसेंबरमध्ये युवा संवाद कार्यक्रम, जानेवारीत ‘नो ड्रग्स झोन’ मोहीम, फेब्रुवारीत निबंध स्पर्धा, मार्चमध्ये फिटनेस मॅरेथॉन, एप्रिलमध्ये यशस्वी उपक्रमांच्या कथा मांडण्याचे कार्यक्रम आणि मे महिन्यात उत्कृष्ट वॉर्ड व कॅम्पस पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या अभियानासाठी ‘नशामुक्त मुंबई, सुरक्षित भविष्य’, ‘आपली मुंबई, नशामुक्त मुंबई’ तसेच ‘मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज (MAD)’ ही घोषवाक्ये निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, धार्मिक संघटना, सेलिब्रिटी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक संघटनांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.
यासंदर्भात बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ड्रग्जविरोधातील लढा केवळ कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या कारवाईवर अवलंबून राहून यशस्वी होणार नाही. समाजातील सर्व स्तरांतील घटकांना सहभागी करून व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई ड्रग्जमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Drugs free mumbai साठी प्रत्येक पोलिस परिमंडळात समन्वय समिती
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस परिमंडळात स्वतंत्र समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. या समित्यांमध्ये वॉर्ड अधिकारी, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, समुपदेशक, पत्रकार प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि स्थानिक पोलिस निरीक्षक यांचा समावेश असेल.
हेही वाचा : Admissions : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि नागरिक यांना एकत्र आणून समाजपातळीवर ड्रग्जविरोधी वातावरण निर्माण करणे हा या समित्यांचा प्रमुख उद्देश असणार आहे. २१ जूनपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



