FYJC Admission : अकरावी अर्ज दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार संधी
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण संचालनालयाचा निर्णय
मुंबई :
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून काही चुकीची माहिती भरली गेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत अर्जात भरलेली चुकीची माहिती दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. यासंदर्भातील सूचना सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना दिल्या आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी नुकतीच पार पडली. या फेरीदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना झालेल्या चुकांमुळे त्यांना प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत होता. अर्जातील माहिती आणि कागदपत्रांतील तपशील यामध्ये तफावत आढळल्याने कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेशापासून वंचित राहिले. यासंदर्भातील अनेक तक्रारी शिक्षण विभागापर्यंत पोहोचल्या. या तक्रारींची दखल घेत व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. शिक्षण संचालनालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
FYJC Admission : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही
ज्या विद्यार्थ्यांना अर्जातील चुकीच्या माहितीमुळे प्रवेश नाकारण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेरीत अर्जातील माहिती दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक किंवा मानवी चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा प्रयत्न शिक्षण संचालनालयाकडून केला जात आहे. याबाबतची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना स्थानिक शिक्षण प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाही या निर्णयाची माहिती देऊन संबंधित विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास सांगितल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.



