Girgaum power supply : सुरळीत होईपर्यंत पाठपुरावा सुरूच – मंत्री मंगलप्रभात लोढा
वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा; BESTकडून तात्पुरत्या पर्यायी व्यवस्थांची अंमलबजावणी
मुंबई :
गिरगाव परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नगरसेविका स्नेहल तेंडुलकर आणि BEST प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेत लोढा यांनी कामातील विलंब, समन्वयाचा अभाव आणि निष्काळजीपणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. नागरिकांना होणारा त्रास असह्य आहे. त्यामुळे कोणीही काम अर्धवट ठेवून निघून गेल्यास स्वतः आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांनीदेखील वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका स्पष्ट केली.
मरीन लाइन्स पुलाजवळील BEST उपकेंद्र परिसरात ३३ हजार व्होल्ट क्षमतेच्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही केबल रेल्वे रुळाखालून गेल्यामुळे दुरुस्ती प्रक्रियेला अधिक वेळ लागत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पर्यायी उपाय म्हणून विविध भागांतून ११ हजार व्होल्ट क्षमतेचा वीजपुरवठा वळविण्यात आला आहे.
Girgaum : नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी विशेष बस तैनात
नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यावर जलद कार्यवाही करण्यासाठी गायवाडी येथे BESTची विशेष बस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे स्थानिकांना थेट तक्रारी मांडणे सोपे होणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्नेहल तेंडुलकर यांनी नमूद केले.
वीज मागणीचा अभ्यास करण्यासाठी Girgaum परिसराचे सर्वेक्षण करणार
याशिवाय, वाढत्या वीज मागणीचा अभ्यास करण्यासाठी येत्या काही महिन्यांत संपूर्ण गिरगाव परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त सबस्टेशन्स उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा सुरू असल्याचे समजते. भविष्यात अशा प्रकारचे वीज खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर दिला जाणार आहे. सध्याची वीज खंडित होण्याची समस्या ही नियोजित नसून वाढीव भारामुळे उद्भवणारी तांत्रिक अडचण असल्याचे BEST प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सूचना प्रणाली विकसित करण्याची तयारीही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा : E-Buses : चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा – मुख्यमंत्री
सध्या फाटकवाडी येथून फॉल्ट दुरुस्ती पथके कार्यरत असली तरी त्यांचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने सर्व ठिकाणी वेळेत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पुढील आठवड्याभरात D आणि C विभागासाठी स्वतंत्र दुरुस्ती गाड्या ताडदेव विभागातून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. संबंधित संपर्क क्रमांकही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. गिरगावकरांना पूर्ण दिलासा मिळेपर्यंत या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांनी व्यक्त केला.



