Leprosy Day : कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्रासाठी ‘कुसुम’

३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राज्यभर विशेष सर्वेक्षण

मुंबई :

शाश्वत विकास ध्येयांतर्गत २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे. या मोहीमेमध्ये नियमित सर्वेक्षणातून वंचित राहणाऱ्या उपेक्षित व दुर्लक्षित घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी समाजातील सर्व लपलेले रुग्ण वेळेत शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. मात्र विटभट्टी कामगार, खाण कामगार, बांधकाम मजूर, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील बंदी, आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी, कारखान्यातील कामगार आदी घटक नियमित सर्वेक्षणाच्या वेळी घरी उपलब्ध नसल्याने तपासणीपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन ‘कुसुम’ मोहिमेद्वारे या सर्व घटकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा तयार करून आशा व पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. संशयित रुग्णांची त्वरीत तपासणी, निदान व उपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच सहवासितांची तपासणी करून पात्र व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात येणार आहेत. प्राथमिक अवस्थेत रुग्ण शोधल्यास विकृती टाळता येते आणि रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन सुलभ होते, हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

मोहिमेचा दैनंदिन अहवालाचे विश्लेषण करून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. ‘कुसुम’ मोहिम प्रभावीपणे राबविल्यास राज्य, जिल्हा, तालुका ते गावपातळीवर कुष्ठरोग दुरीकरण साध्य होऊन कुष्ठमुक्त व सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले जाणार आहे.

Leprosy निर्मूलनासाठी ‘स्पर्श’ अभियान

समाजामध्ये जागरूकता व शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे कुष्ठरुग्णांविषयी भेदभाव केला जातो. ज्यामुळे रोगाचा प्रसार आणि उपचाराबाबत गैरसमज वाढतात. त्यामुळे कुष्ठरुग्णांच्या जीवनातील अनेक पैलूंवर परिणाम होतो. या कलंकाचे व भेदभावाचे निराकरण करण्यासाठी व समाजात जागरुकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. “भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या” हे स्पर्श जनजागृती मोहीम २०२६ चे घोषवाक्य आहे. या मोहीमेंतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभांचे आयोजन करून त्यामध्ये सरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व कुष्ठबाधित व्यक्ती यांच्या उपस्थितीत कुष्ठरोगाविषयी जनसामान्यांपर्यंत संदेश पोहचविण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Menopause Treatment Center : देशातील पहिले शासकीय केंद्र महाराष्ट्रात सुरू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *