CET Registration : एमसीए प्रवेश नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ
२३ फेब्रुवारीपर्यंत करता येणार नोंदणी
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार एमसीए आणि एम. एचएमसीटी या अभ्यासक्रमांना यापूर्वी मुदतवाढ दिली होती. मात्र या दोन्ही अभ्यासक्रमांची परीक्षा मार्चमध्ये होणार असल्याने या अभ्यासक्रमांना नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन’ (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एमसीए अभ्यासक्रमासाठी ५० हजार ९६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी एमसीए सीईटीसाठी ५६ हजार २५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी’ (एम. एचएमसीटी) या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. गतवर्षी या अभ्यासक्रमासाठी ८० उमेदवारांनी अर्ज केले होते. या अभ्यासक्रमांना होणाऱ्या नोंदणीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी मिळावी यासाठी सीईटी कक्षाने एमसीए व एम. एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नाेंदणी करता येणार आहे. अर्ज, वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम क्षणाची गर्दी टाळून लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कक्षाने केले आहे.
CET नोंदणीसाठी अपार आयडी व युडीआयडी गरजेचे पण बंधनकारक नाही
यावर्षी पासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी) गरजेचे आहे पण बंधनकारक केले नाही. काही तांत्रिक कारणामुळे जर अपार आयडी व युडीआयडी तयार न झालेल्या विद्यार्थ्यानाही अपार आयडी व युडीआयडीशिवाय सीईटीसाठी नोंदणी करता येईल. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.



