J.J.Hospital : रुग्णांना मिळणार खासगी रुग्णालयाप्रमाणे सुविधा

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत सोयीसुविधांचे लोकार्पण

 

मुंबई :

जे.जे. रुग्णालयामध्ये खासगी रुग्णालयांप्रमाणे अद्ययावत व अत्याधुनिक सोयीसुविधा रुग्णांना उपलब्ध होतील. रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता जे.जे. रुग्णालयामध्ये अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जे.जे. रुग्णालयामध्ये बुधवारी तीन शस्त्रक्रियागृह, दोन अद्ययावत रुग्णकक्ष, केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग आणि सीबीएमई कौशल्य प्रयोगशाळेचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जे. जे. रुग्णालयात विविध आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन शस्त्रक्रियागृह, दोन अद्ययावत रुग्णकक्ष, केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग आणि सीबीएमई कौशल्य प्रयोगशाळांचा समावेश आहे. या सुविधांमुळे रुग्णांना उच्च दर्जाची उपचारसेवा उपलब्ध होण्यास मदत मिळणार असून, यामुळे जे.जे. रुग्णालयातील शैक्षणिक व नैदानिक प्रशिक्षणालाही मोठी चालना मिळणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मेंदूतील गाठी, रक्तस्राव, अपघातजन्य दुखापती व मणक्यांशी संबंधित शस्त्रक्रियांसाठी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असलेले अत्याधुनिक मज्जातंतू शल्यचिकित्सा शस्त्रक्रियागृह जे.जे. रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. यामुळे मेंदू व मणक्याशी संबंधित आजारांवरील अद्ययावत शस्त्रक्रिया करता येणार आहेत. त्याचप्रमाणे कान-नाक-घसा विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उभारण्यात आल्याने कंठग्रंथी (टॉन्सिल) काढण्याची शस्त्रक्रिया, कर्णपटल दुरुस्ती व आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे जन्मजात विकृती, हर्निया व अस्थिरोग विषयक शस्त्रक्रिया बालस्नेही पायाभूत सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी बालरुग्णांसाठी स्वतंत्र बाल शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. तसेच रुग्णकक्ष क्रमांक ११ व १८ मध्ये वैद्यकीय व शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुधारित पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याने शस्त्रक्रियेपूर्व व शस्त्रक्रियेनंतरच्या सेवांसाठी सुसज्ज व्यवस्था रुग्णांना उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आला आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण, संसर्ग नियंत्रण व सुरक्षित साहित्य पुरवठा यामुळे रुग्णालयीन स्वच्छता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. रक्तपेढीचे आधुनिकीकरण करून रक्तसाठवण, घटक विभाजन, तपासणी व आपत्कालीन रक्तपुरवठा अधिक सक्षम करण्यात आला आहे. या सर्वसमावेशक सुधारणांमुळे विशेष उपचारांची उपलब्धता, संसर्ग नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता व शैक्षणिक प्रशिक्षण विस्तार यांना मोठी चालना मिळणार असून महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सीबीएमई कौशल्य प्रयोगशाळा voice of eastern
सीबीएमई कौशल्य प्रयोगशाळा

J.J.Hospital मध्ये कौशल्य प्रयोगशाळा सुरू

जे.जे. रुग्णालयामध्ये वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करण्यापूर्वी त्यांना सराव व्हावा यासाठी सातव्या मजल्यावर सीबीएमई कौशल्य प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमुळे रुग्णालयातील विद्यार्थ्यांना सिम्युलेशन आधारित प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय शिक्षण मानकांनुसार प्रशिक्षण मिळणार आहे.

हेही वाचा : irregularity work : आढळल्यास संस्थांना काळ्या यादीत टाका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *