MSRTC : कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल मंत्रालयात धूळखात

अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याशिवाय राहणार नाही, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा पुन्हा एकदा इशारा

मुंबई : 

एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता मिळाला नाही. निधीच्या मागणीची फाईल राज्य सरकारच्या अर्थ खात्यात १० फेब्रुवारी निर्णयाविना पडून आहे. हप्ता न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला असून “बोंब मारो” आंदोलन करून अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याशिवाय कर्मचारी राहणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी राज्य सरकारला आंदोलन करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आझाद मैदानामध्ये आंदोलन केले जाणार आहे. एसटी महामंडळाने निधी मागणीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार केला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जातीने लक्ष देत आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या परिवहन विभागाने सुद्धा अनेकवेळा पत्रव्यवहार करून सुद्धा अर्थ खात्यातील अधिकारी या फाईलकडे लक्ष द्यायला तयार नसून ते झोपेचे सोंग घेऊन सुस्त झाले आहेत. अर्थ खात्याचा प्रभार असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी, अन्यथा कर्मचाऱ्यांना बोंब मारो आंदोलन करून कानउघडणी करावी लागेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

MSRTC तील ८६ हजार कर्मचारी वेतनवाढीपासून वंचित

एसटी महामंडळातील ८६००० कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतनवाढ फरक रक्कम हप्ता मिळाला नसल्याने त्यासाठी एसटीने राज्य सरकारकडे १९२. ४६ कोटी रुपयांची मागणी केली असून दर महिन्याला सरकारकडून येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेसह एकूण ७२५ .४६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असताना फक्त ४०० कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकार कडून देण्यात आल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे.

हेही वाचा : J.J.Hospital : रुग्णांना मिळणार खासगी रुग्णालयाप्रमाणे सुविधा

या महिन्यात वेतनतील फरकाची वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना दिली नाही. याला निव्वळ राज्य सरकारचे अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असून उर्वरित रक्कम येत्या सोमवार पर्यंत न मिळाल्यास मंगळवार पासून कर्मचाऱ्यांचा आक्रोश व असंतोष कळावा यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *