आधुनिक Cancer Medicine सामान्यांच्या आवाक्याबाहेर – टाटा रुग्णालय

मुंबई :

कर्करेागावरील उपचार सर्वसामान्यांच्याही आवाक्यात यावेत यासाठी जगभरामध्ये संशोधकांकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र आजघडीला जगभरात कर्करोगावर असलेली आधुनिक औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचा निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) आणि ॲक्ट्रॅक्ट यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. हे संशोधन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘हेड ॲण्ड नेक’ या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

‘मान, डोक्याच्या कर्करोगासाठी वापरल्या जाणाऱ्या टार्गेटेड थेरपी आणि इम्यूनोथेरपी औषधांच्या परवडण्याच्या निकषांतील असमानता’ या शीर्षकाखाली टाटा रुग्णालयाने हा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये भारत, अमेरिका, इंग्लंडसह सात देशांमध्ये करण्यात आला. यामध्ये देशांतील आधुनिक कर्करोग औषधांच्या किंमतींची तुलना करण्यात आली. यामध्ये इम्यूनोथेरपीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पेम्ब्रोलिझुमॅब’ आणि ‘निवोलुमब’ यासारखी रुग्णांचे आयुष्य वाढवू शकणाऱ्या औषधांवर अभ्यास करण्यात आला. दरम्यान, भारतात सहा महिन्यांच्या पेम्ब्रोलिझुमॅबची किंमत सरासरी मासिक उत्पन्नाच्या जवळजवळ ८० पट आहे आणि निव्होलुमॅबची किंमत सरासरी मासिक उत्पन्नाच्या २० पट जास्त आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही अशीच परिस्थिती आढळून आली. अमेरिका आणि युके सारख्या विकसित देशांमध्येही ही औषधे आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याचे दिसून आले. अभ्यास केलेल्या कोणत्याही देशात ही औषधे खरोखर परवडणारी नसल्याचे आढळून आले. ‘इम्युनोथेरपी’ या नव्या उपचारपद्धतीची किंमत सर्वच देशांत अत्यंत जास्त असून बहुतांश कुटुंबांसाठी ती परवडणारी नसल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले. भारतात एका रुग्णावर ‘पेम्ब्रोलिझुमॅब’ उपचारासाठी लागणाऱ्या खर्चात १८ ते २२ रुग्णांवर कमी किमतीच्या टार्गेटेड थेरपीने उपचार करता येत असल्याचे निदर्शनास आले. या स्वस्त औषधांची परिणामकारकता इम्युनोथेरपीइतकी नसली, तरी मर्यादित खर्चात अधिक रुग्णांपर्यंत उपचार पोहोचविण्यास ही औषधे फायदेशीर ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

Cancer औषधांच्या किंमत धोरणात मूलभूत सुधारणा आवश्यक

संशोधकांनी महागड्या औषधांचा वापर काटेकोर वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आणि निवडक रुग्णांपुरता मर्यादित ठेवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच भारतीय परिस्थितीनुसार परिणामकारक आणि किफायतशीर उपचार पर्यायांवर अधिक संशोधन करण्याची मागणी केली. जेनरिक आणि बायोसिमिलर औषधांचा प्रसार केल्यास खर्च कमी होऊ शकतो; मात्र त्यासाठी कडक गुणवत्ता तपासणी, नियामक देखरेख आणि सातत्यपूर्ण सुरक्षा परीक्षण आवश्यक असल्याचे अभ्यासात नमूद केले. भारत सरकार ‘आयुष्मान भारत’ योजनेद्वारे आरोग्य संरक्षणाचा विस्तार करत असून काही कर्करोग औषधांवरील सीमाशुल्कही कमी केले. तरीही, औषधांच्या किंमत धोरणात मूलभूत सुधारणा न झाल्यास महागडे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहतील, असा इशारा या अभ्यासातून देण्यात आला आहे. इम्युनोथेरपी या उपचार पद्धतीसाठीच्या औषधांच्या किंमत नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी वाटाघाटी, उच्च-गुणवत्तेच्या जेनरिक औषधांना प्रोत्साहन, योग्य विमा रचना आणि तंबाखू, सुपारी व मद्यपान नियंत्रणासह लवकर तपासणी कार्यक्रमांवर भर देण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली.

हेही वाचा : MHT-CET च्या अर्जात ७ मार्चदरम्यान ऑनलाईन दुरुस्ती सुविधा

इम्युनोथेरपी केवळ महाग नाही, तर बहुतेक कुटुंबांच्या पूर्णतः आवाक्याबाहेर आहे. भारतात इम्युनोथेरपीच्या सहा महिन्यांचा उपचारासाठी अनेक वर्षांचे उत्पन्न खर्च करावे लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रगती झाली असली तरी प्रत्यक्ष लाभाच्या तुलनेत या औषधांच्या किंमती अधिक असल्याने रुग्णांना त्या परवडणाऱ्या नाहीत.
– डॉ. अर्जुन सिंग, प्रमुख लेखक, टीएमसी

अनेक रुग्णांना कर्करोगावरील उपचाराचा खर्च स्वत: करावा लागतो. प्रचंड खर्चामुळे रुग्ण व त्याचे कुटुंबाला दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो. प्रतिबंध, लवकर निदान आणि सुलभ उपचार व्यवस्था हीच मृत्यूदर कमी करण्याची प्रभावी साधने आहेत. केवळ महागडी औषधे हा प्रश्न सोडवू शकत नाही.
– डॉ. पंकज चतुर्वेदी, सहलेखक आणि संचालक, ॲक्ट्रॅक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *