ST महामंडळाचे डिझेलविना हाल; उत्पन्नात घट
मुंबई –
एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. पण राज्य सरकारच्या अर्थ खात्याने गुजरातमधून डिझेल खरेदी करण्यास अद्याप परवानगी दिली नाही. डिझेल अभावी राज्यातील ५५ आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवासी व चालक या दोघांनाही त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटीला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लीटर इतके डिझेल लागत असून इंधनावर वर्षाला सरासरी ३ हजार ४०० कोटी रुपये इतका खर्च होतो. एसटीच्या प्रवासी उत्पन्नात सुद्धा अपेक्षित वाढ होत नसल्याने व मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये मूल्यवर्धित कर कमी असल्याने डिझेल स्वस्त असल्याने गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती.
पुरवठादार कंपनीचा ST सोबतचा करार संपल्याने डिझेल बंद
पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याची परवानगी मागितली होती. पण अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी त्याला अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही. यापूर्वीची पुरवठादार कंपनी बीपीसीएलचा करार संपल्याने त्यांनी एक महिन्यापासून डिझेल देणे बंद केले आहे. परिणामी फेऱ्या उशिरा जात आहेत. काही विभागात प्रस्तावित किलोमीटर रद्द होत असल्याने त्याचा परिणाम प्रवासी उत्पन्नावर झाला आहे. हंगामी भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. साधारण १५ टक्के प्रवासी उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून ऐन हंगामात एसटीचे आर्थिक नुकसान झाले आहे. याला निव्वळ राज्य सरकारचे अर्थ खाते जबाबदार असून राज्याचे मुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्ती करून तात्काळ उचित निर्णय घ्यावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.
ऐन उन्हाळ्यात चालकांना त्रास
एसटीकडे एकूण २५१ डिझेल पंप असून त्यातील १९६ आयओसीचे व ५५ बीपीसीएलचे आहेत. बीपीसीएलचे कंत्राट संपल्याने ५५ डिझेल पंप गेले महिनाभर बंद आहेत. ज्या आगारातील पंप बंद आहेत, तिथल्या गाड्यांना दुसऱ्या आगारात डिझेल भरण्यासाठी जावे लागत आहे. ते दूरवर आहेतच पण तिथे गाड्या वाढल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. गाडी घेऊन चालकांना तासनतास रांगेत राहून डिझेल भरावे लागत आहे. या प्रकारामुळे ऐन उन्हाळ्यात चालकांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.


