Dharavi Redevelopment : नागरिकांचा हायर पर्चेस योजनेला विरोध

पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन गुंडाळला बासनात

मुंबई –

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मास्टर प्लॅन बासनात गुंडाळून ठेवत डीआरपी पुनर्विकासाचा गाडा रेटू पाहत आहे. यातच हायर – पर्चेस योजना धारावीकरांच्या माथी मारून मूळ धारावीकरांना उद्धवस्त करण्याचे धोरण मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीने आखले आहे. या योजनेला धारावीकरांचा तीव्र विरोध असून एकही धारावीकर धारावीबाहेर जाणार नाही, असा इशारा उबाठा गटाचे उपशाखा प्रमुख अप्पूराज देवेंद्र यांनी दिला आहे.

Dharavi : धारावीकरांना अपात्र करण्याचे षडयंत्र

राज्य सरकारने धारावीचा विशेष प्रकल्प म्हणून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धारावीच्या पुनर्विकासासाठी मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीची नेमणूक केली आहे. डीआरपी आणि मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि कंपनी एकत्रितपणे धारावी पुनर्विकास करत आहे. पुनर्विकासाला प्रारंभ करण्यापूर्वी डीआरपीने प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र आजवर प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर न करताच धारावीकरांना पात्र अपात्र करण्याचे षडयंत्र कंपनीने सुरू केले आहे. याविरोधात धारावीतील जनता असून जोवर प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर होत नाही, तोवर प्रकल्पाची एक वीट रचू देणार नसल्याचा इशारा धारावीकरांनी दिला आहे.

Dharavi Redevelopment : रहिवाशांकडून तीव्र विरोध

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पुनर्विकास आधी की टू की पद्धतीने राबविण्याची टिमकी डीआरपीने मिरवली होती. मात्र आता आपल्याच शब्दापासून फारकत घेत रहिवाशांना धारावीबाहेर हकलण्याचा इरादा कंपनीने केला आहे. याला धारावीतील रहिवाशांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. पात्र अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करावे, या मागणीवर धारावीकर ठाम असून त्यासाठी आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही अप्पूराज देवेंद्र यांनी दिला आहे.

अन्यथा आमचा प्रकल्पाला विरोध कायम राहील

त्याचप्रमाणे धारावीत वास्तव्यास असलेल्या वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना धारावीबाहेर घर देण्याची सक्ती डीआरपी करत आहे. याला आमचा विरोध आहे. झोपडीधारकाला हायर – पर्चेस योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २५ वर्षांसाठी नाममात्र भाडे भरून २६ व्या वर्षी घरचा मालकी हक्क मिळवता येईल, असे डीआरपी बोलत आहे. याला आमचा कडाडून विरोध आहे. सर्व झोपडीधारकांना धारावीत मोफत घरे द्यावीत, अन्यथा आमचा प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे शिवसेना उबाठा गटाचे उपशाखा प्रमुख अप्पूराज देवेंद्र यांनी सांगितले.

हेही वाचा : SSC Result : मुंबई विभागातून १४६१ शाळांचा निकाल १०० टक्के

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *