SSC Result : मुंबई विभागातून १४६१ शाळांचा निकाल १०० टक्के
मुंबई :
राज्यामध्ये ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असताना मुंबई विभागातील १ हजार ४६१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागातून १०० टक्के लागलेल्या शाळांमध्ये मुंबईतून सर्वाधिक ५९५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबईतूनही पश्चिम उपनगरातील सर्वाधिक २९५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच शाळांच्या निकालालाही महत्त्व वाढत आहे. दहावीचा १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल अधिक असल्याने शाळाही दहावीचा निकाल चांगला लावण्यासाठी प्रयत्न करत असतात. राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, त्यात मुंबई विभागानेही चांगली कामगिरी केली आहे. मुंबई विभागातून तब्बल १ हजार ६४१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागातील मुंबई जिल्ह्यातून सर्वाधिक ५९५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये पश्चिम उपनगरातील २५९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, त्याखालोखाल मुंबई शहर मधील १७६ आणि पूर्व उपनगरातील १६० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ४४२ शाळांचा निकाल १०० टक्के
मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ४४२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये ठाणे व नवी मुंबई शहरातून सर्वाधिक १४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याखालोखाल डोंबिवलीतील ९६ शाळा, भाईंदरमधील ६८ शाळा, बदलापूरमधील ४३ शाळा, मुरबाडमधील २८ शाळा, उल्हासनगर व भिंवडीमधून प्रत्येकी १८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, कल्याण तालुक्यातून १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
SSC result : रायगडच्या २४५ शाळांची शतकी बाजी
रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील ६३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याखालोखाल खालापूर ३६, महाड २८, कर्जत २३, रोहा व माणगावमधील प्रत्येकी १८ शाळा, पोलादपूरमधील १३ शाळा, उरण, अलिबाग व श्रीवर्धनमधील प्रत्येकी १० शाळा, त्यानंतर मुरुडमधील ९ आणि म्हसळा तालुक्यातील ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
पालघरमध्ये १५२ शाळांचा १०० टक्के निकाल
पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील ९१ शाळांनी शतकी बाजी मारली. त्याखालोखाल बोईसरमधील ३६ शाळा, डहाणूमधील १५ शाळा, जव्हारमधील १० शाळा, वाडामधील ८ शाळा, मोखाडा, विक्रमगड आणि तलासरीमधील प्रत्येकी ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.



