Tukaram Mundhe : दुधात भेसळ करणाऱ्याची गय करणार नाही
तुकाराम मुंढे यांचा डेअरी चालकांना सज्जड दम

मुंबई :
प्रतिबंधित गुटखा, पानमसालाबरोबरच खाद्यपदार्थ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांनी महाराष्ट्रातील डेअरी चालकांची दुधात भेसळ केल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड दम भरला आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जाते. ही भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार कारवाई करूनही दूध भेसळीला आळा घालण्यात अन्न व औषध प्रशासनाला फारसे यश येत नाही. अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बनावट औषधे, गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अवघ्या १५ दिवसांत कोट्यवधीचा माल जप्त करत जवळपास २५० पेक्षा अधिक व्यक्तींवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
Tukaram Mundhe यांचा डेअरी चालकांना इशारा
बनावट औषधे, गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांपाठोपाठ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा दूध उत्पादक, वितरक आणि डेअरी चालकांकडे वळवला आहे. तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी मुंबईतील एफडीए मुख्यालयात महाराष्ट्रातील प्रमुख डेअरी चालकांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दुधात पाणी किंवा इतर घातक पदार्थांची भेसळ अजिबात सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात मुंढेंनी डेअरी चालकांना सुनावले.
ग्राहकापर्यंत दुधाचा प्रवास सुरक्षित करा – Tukaram Mundhe
दुधात पाणी किंवा रासायनिक भेसळ करणाऱ्यांनाच नव्हे, तर ‘अस्वच्छ पद्धती’ आणि चुकीच्या हाताळणीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. उत्पादकापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत दुधाचा प्रवास संपूर्णपणे सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार असावा, अशा सक्त सूचना त्यांनी डेअरी चालकांना दिल्या आहेत. यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रार नोंदणीसाठी टोल-फ्री क्रमांक
अन्नपदार्थाचा दर्जा आणि भेसळीबाबत तक्रारीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विशेष ॲपची महाराष्ट्रामध्ये अमलबजावणी करण्यात येणार आहे. या ॲपवर राज्यातील नागरिकांना तक्रार सहज नोंदविता येणार आहे. तसेच १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना संपर्क साधून तक्रार करता येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले सांगितले. तसेच jc-foodhq@nic.in या ईमेलवरती अन्नपदार्थाच्या दर्जा व भेसळीबाबतही नागरिकांना तक्रार करता येणार आहे.



