Cet Registration : बीएड–एमएड व ५ वर्ष एलएलबी नोंदणीस मुदतवाढ

मुंबई : 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेण्यात येणाऱ्या बीएड–एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) आणि ५ वर्षीय एलएलबी या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही नोंदणी प्रक्रिया ९ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या विनंतीचा विचार करून प्रवेश नोंदणीची अंतिम मुदत वाढवून आता १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. सुधारित नोंदणी प्रक्रिया २५ जानेवारीपासून सुरू असून इच्छुक उमेदवारांना या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

law
law

आतापर्यंत बीएड–एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) सीईटीसाठी ४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ५ वर्षीय एलएलबी सीईटीसाठी १३,१७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. बीएड–एमएड (३ वर्षीय एकात्मिक) या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा ९ एप्रिल २०२६ रोजी, तर ५ वर्षीय एलएलबीची सीईटी प्रवेश परीक्षा ८ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, नोंदणीचे सविस्तर वेळापत्रक तसेच माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर [www.mahacet.org](http://www.mahacet.org) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

यंदा cet नोंदणीचा कल वाढला

मागील वर्षांच्या तुलनेत यंदा नोंदणीचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. २०२५ मध्ये बीएड–एमएड (३ वर्षीय एकात्मिक) सीईटीसाठी १,१३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५ वर्षीय एलएलबी सीईटीसाठी तब्बल ३५,०७४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. तसेच २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्येही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केली होती.

हेही वाचा : CET Exam : परिचारिका अभ्यासक्रमांची नोंदणी शनिवारपासून सुरू

दरम्यान, यावर्षीपासून सीईटी प्रवेश नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री’ (अपार) आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांची पडताळणी सुलभ व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजिलॉकरच्या माध्यमातून तयार करावा, असे आवाहन सीईटी कक्षातर्फे करण्यात आले आहे.

परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती, सविस्तर वेळापत्रक आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी उमेदवारांनी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *