Drug-free Mumbai : गणेश मंडळांनी समाजप्रबोधनावर भर द्यावा : लोढा

मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावा. मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे व सजावट ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाच्या अनुषंगाने साकारून समाजप्रबोधनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. “सार्वजनिक गणेशोत्सवाला जनजागृतीची परंपरा आहे आणि त्यामुळे या गणेशोत्सवात मंडळांनी आपले देखावे, किंवा सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या समाजाला ड्रग समस्येविरुद्ध एकत्र आणावे. जेणेकरून आपले तरुण अधिक सजग होतील आणि अधिक मोठ्या प्रमाणात ड्रग-फ्री मुंबई ची शपथ घेतील” असे लोढा यांनी सांगितले.

Mangal prabhat lodha - voice of eastern
मंगल प्रभात लोढा

नाना चौक येथील महापालिकेच्या डी विभाग कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मंगळवारी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ७० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व समन्वय समितीचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, दक्षिण मुंबईतील नगरसेवक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अग्निशमन दल तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांना महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांची विविध परवानगी वन विंडो पद्धतीने मिळावी, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना लोढा यांनी दिल्या. तसेच गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

समुद्रात किंवा बाणगंगेमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची मागणी गणेश मंडळांनी केली असून त्याबाबत कोर्टात देखील सुनावणी सुरु आहे. या मागणी मागे आपल्या बाप्पाचे भव्य विसर्जन व्हावे ही भावना असल्याने ती भावना जपण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे लोढा यांनी सांगितले. कृत्रिम तलाव देखील भव्य स्वरूपात उभारता येऊ शकतात या बाबत अभ्यास करावा असे लोढा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुचवले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे ५ ते ६ फूट उंचीचा विस्तृत कृत्रिम तलाव उभारण्यात यावा. तसेच अन्य संभाव्य विसर्जनस्थळांचीही पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे लोढा यांनी सांगितले.

Do Originals advt
Do Originals advt

खेतवाडीमध्ये गणेशोत्सवासाठी देशभरातून भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. गिरगाव चौपाटीवरील निर्माल्य वेळेत उचलण्यासाठी महापालिकेने दिवसातून दोन वेळा कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी समुद्रात विसर्जन झाल्यानंतर मूर्तीची विल्हेवाट तातडीने लावण्यात यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असल्याने आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात यावेत. तसेच गणेश मंडळांच्या आवारात पार्क केलेल्या वाहनांवर गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी बैठकीत केली.

गिरगाव चौपाटी आणि समुद्रकिनारी भाविकांच्या सुरक्षेसाठी गरजेनुसार लाइफगार्डची संख्या वाढविण्यात येईल. शाडूच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दोन ते तीन व्यक्तींना परवानगी देण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. समुद्रातील भरती-ओहोटीची माहिती गणेश मंडळांना वेळेवर मिळावी, यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली.

गणपती आगमनाच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. रस्त्यालगतच्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करावी. तसेच रस्त्यावरील अनावश्यक केबल वायर काढून टाकाव्यात, असे निर्देश महापालिकेला देण्यात आले. खेतवाडी येथील १ ते १४ गल्लीमध्ये पावसामुळे पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने वेळोवेळी औषध फवारणी करावी, असेही लोढा यांनी सांगितले. खेतवाडी येथील शाळेत हिरकणी कक्ष सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या गणेश मंडळांना भेडसावत असल्याने बेस्ट उपक्रमाने यावर तातडीने उपाययोजना करावी. रात्रीच्या वेळी गणेश मंडळे आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मुबलक वीजपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देश लोढा यांनी दिले. मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील प्रमुख चौकांवर विद्युत रोषणाई करून परिसर सुशोभित करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका आणि बेस्ट प्रशासनाला दिल्या. दरम्यान, काही गणेशोत्सव मंडळांचे डिपॉझिट रिफंड अद्याप मिळाले नसल्यास संबंधित मंडळांनी धरम पॅलेस येथील कार्यालयात अर्ज करावा. संबंधित प्रकरणांची कार्यवाही करून रिफंड मिळवून देण्यात येईल, असेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

Drug-free Mumbai : महापालिकेने कसली कंबर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या डी विभागाकडून गिरगाव चौपाटीवर विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गिरगाव चौपाटीवरील वाळूमध्ये वाहने रुतू नयेत, यासाठी १,१९४ फ्लेट्स वाळूमध्ये बसविण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चौपाटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी १३ कृत्रिम तलावांची गिरगाव चौपाटीवर व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्दी आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांसाठी वॉच टॉवरचीही व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : IIRF ranking : आयआयआरएफमध्ये जे.जे. रुग्णालय देशात १८ व्या तर राज्यात पहिल्या स्थानावर

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत