School Close : राज्यातील शाळांना सुट्टी; विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलली
मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी तीन दिवसांचा दिवसांचा दुखवटा जाहीर करत शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर केली. तसेच मुंबई विद्यापीठाने दुपारच्या सत्रामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून सर्व संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, सीडीओई यांना कळविण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सध्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. त्यानुसार सर्व महाविद्यालये व परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करत २८ जानेवारी रोजी शासकीय कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. त्याअनुषंगाने मुंबई विद्यापीठाच्या सुरू असलेल्या दुपारच्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत तात्काळ कळविण्याच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
वाणिज्य व व्यवस्थापन, कला व शिक्षण शाखांशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (सीडीओई) चे संचालक यांना यासंदर्भात पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी दुपारी होणाऱ्या परीक्षा पुढील तारखेला घेण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. या परीक्षेसंदर्भातील नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.
School : शाळांनाही सुट्टी जाहीर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना दुपारच्या सत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. दरम्यान अपघात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास झाल्याने सकाळच्या सत्रातील शाळा भरल्या. तर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा : MNS पत्रानंतर मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा



