Mumbai University : एलएलएम परीक्षा पुढे ढकलली
१० फेब्रुवारी रोजी होणार २३ फेब्रुवारी रोजी परीक्षा
मुंबई :
मुंबई विद्यापीठाकडून एलएलएमच्या सत्र १ ची परीक्षा १० फेब्रुवारीपासून जाहीर केली होती. मात्र गतवर्षी एप्रिलमध्ये सत्र १ ची परीक्षा झाली असताना यंदा फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होती. परीक्षा लवकर घेण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर व अभ्यासावर हाेण्याची शक्यता होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत हाेती. याची दखल घेत मुंबई विद्यापीठाने ही परीक्षा २३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई विद्यापीठाकडून एलएलएम सत्र १ परीक्षेचे वेळापत्रक २१ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र एलएलएमचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन काही महिने उलटले असतानाच आणि गतवर्षी सत्र १ ची परीक्षा एप्रिलमध्ये झाली असल्याने यंदाही परीक्षा त्याच कालावधीत होण्याची शक्यता होती. मात्र विद्यापीठाकडून २१ जानेवारी रोजी ही परीक्षा १० फेब्रुवारी रोजी असल्याचे जाहीर केले. परीक्षा लवकर जाहीर केल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर तसेच त्यांच्या अभ्यासावर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे ही परीक्षा किमान महिनाभर अगोदर जाहीर करण्यात यावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. ही बाब लक्षात घेत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठ कुलसचिव मान.डॉ.प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ न मिळाल्यास ते अनुत्तीर्ण हाेतील. याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता व्यक्त करत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यावर कुलसचिवांनी त्यांना सकारात्मक आश्वासन दिले होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने १० फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा जुन्या वेळापत्रकाच्याच तारखेने सुधारित वेळापत्रक जाहीर करत परीक्षा पुढे ढकलली. सुधारित वेळापत्रकानुसार आता एलएलएम सेमिस्टर-१च्या परीक्षा २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
हेही वाचा : राष्ट्रीय Kho-Kho स्पर्धा : कुरुक्षेत्रात महाराष्ट्राचा सुवर्णइतिहास
दरम्यान, १० फेब्रुवारीपासून परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक होता. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी झाला, अशी माहिती भाजप विद्यार्थी कार्यकर्ता ॲड. सचिन पवार यांनी सांगितले. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून त्यांचा मानसिक ताण कमी झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे.



