Admissions : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
९ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली
मुंबई :
महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा दुसरा भाग भरलेल्या ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली. शिक्षण संचालनालयाने सकाळी ११ वाजता नियमित फेरी-१ ची पहिली गुणवत्ता यादी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या २१ लाख ९८ हजार ६६६ जागांसाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ ‘लॉक’ केला होता. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून दोन वेळा मुदतवाढ दिल्याने विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मुदतीमध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली.

अधिकृत वेबसाइट mahafyjcadmissions.in वर ही यादी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, सर्व विद्यार्थी एकाच वेळी संकेतस्थळावर आल्याने त्याला वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे.
कसे तपासाल यादी?
विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनमध्ये जावून कॅप ॲडमिशन मधील कॅप अलॉटमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि शाखा कला, वाणिज्य, विज्ञान निवडून वाटप यादी तपासावी.वाटप झालेल्या महाविद्यालयाचे नाव, कट-ऑफ गुण आणि इतर माहिती उपलब्ध होईल.
Admissions : प्रवेश कसा घ्याल
विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनमध्ये जावून अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करून आपले कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतर कॅप ॲडमिशनमधील आपली सहमती प्रोसेड फॉर ॲडमिशन या पर्यायावर क्लिक करून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात २९ मे ते ३ जून २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. यामध्ये शुल्क भरून जागा निश्चित करणे आवश्यक आहे.
पसंतीक्रमाच्या २ ते १० क्रमांकामधील महाविद्यालय वाटप झाले असल्यास काय कराल
जर विद्यार्थ्यास त्यांच्या पसंतीक्रमाच्या २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय वाटप झाले असेल आणि त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांस प्रवेश हवा असेल तर, वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील फेरीच्या सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केलल्या जातील त्याप्रमाणे कार्यवाही करावी.



