ITIच्या दोन लाख विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पुढाकार; कौशल्य विभाग आणि ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’मध्ये सामंजस्य करार

मुंबई :

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिक्षण घेणाऱ्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा, बचावकार्याची प्राथमिक तंत्रे, मानवी जीविताचे संरक्षण, तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे.

ITI स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास

यावेळी बोलताना मंत्री लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विविध जनजागृतीपर आणि कौशल्यवर्धक उपक्रम राबवले जात आहेत. त्याच धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीआय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण हा त्याच मालिकेतील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : मुंबई-कोकणातील शेकडो School बंद होण्याची भीती

कोणतीही आपत्ती पूर्वसूचना देत नाही. नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, अशा संकटांच्या वेळी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. युवकांना आवश्यक कौशल्ये दिल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला प्रभावी सहकार्य मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी सांगितले की, शहरी तसेच ग्रामीण भागातील विविध आपत्तींचा अभ्यास करून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याची तयारी करून देणे हा उद्देश आहे.

हेही वाचा :  उद्योग क्षेत्रासाठी देशात पहिली ‘AI लिविंग लॅब’ सुरु

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनीही बदलत्या काळानुसार आपत्तींचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे नव्या पिढीला यासंबंधी प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सहसंचालक सतीश सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *