Shivshaurya saga : मुंबई विद्यापीठाचा ‘उडान’ जल्लोषात

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने आयोजित ‘उडान: द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन’ या भव्य महोत्सवाचा ‘मेगा फायनल’ सोहळा १८ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मराठी भाषा भवन येथे उत्साहात संपन्न झाला. १९ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेला हा महोत्सवाचा प्रवास मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील ७ जिल्ह्यांमधील १८ विविध केंद्रांवर यशस्वीरित्या पार पडल्यानंतर बुधवारी महा अंतिम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ३८० हून अधिक महाविद्यालयांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला होता.

प्रत्येक केंद्रावरील विजेत्या स्पर्धकांना आजच्या या अंतिम फेरीत आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, ज्यामुळे स्पर्धेची चुरस अधिकच वाढली होती. या महाअंतिम सोहळ्यात विविध सांस्कृतिक आणि वैचारिक स्पर्धांचा उच्चांक पाहायला मिळाला. सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणाऱ्या पथनाट्य स्पर्धेसाठी १९ स्पर्धक संघ होते तर तर शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या पोवाडा गायन स्पर्धेत १० संघांनी सहभाग घेतला. तसेच वक्तृत्व आणि सृजनशील लेखन आणि भित्तीचित्र स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी १९ स्पर्धकांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी कला आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. महाराष्ट्राची लोककला जागतिक स्तरावर नेणारे प्रसिद्ध लोककलावंत श्री. नंदेश उमप यांच्यासह मान्यवरांनी विविध स्पर्धांचे चोख परीक्षण केले.

Shivshaurya saga : महाराजांची जीवनशैली आणि युद्धनीतीवर व्याख्यान

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवशौर्य गाथा’ हा कार्यक्रम. यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी महाराजांच्या जीवनशैलीतून आणि युद्धनीतीतून आजच्या पिढीने काय शिकावे, यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. या प्रबोधनात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि शौर्याची प्रेरणा जागृत झाली.

हेही वाचा : CET Registration : एमसीए प्रवेश नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि प्रा. कुणाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या उडान महोत्सवामुळे मुंबई विद्यापीठाचा परिसर कौशल्य, कला आणि इतिहासाच्या त्रिवेणी संगमाने न्हाऊन निघाला, असे प्रतिपादन आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *