MPSC : निकाल जाहीर; मुख्य परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध
राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकालाच्या गुणांची सीमारेखा जाहीर
मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा (कट ऑफ) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे व त्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्याच्या अटीच्या अधीन राहूनच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षेच्या निकालानुसार मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी केवळ विहित कालावधीत स्वतंत्र अर्ज सादर करून परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेबाबतची सविस्तर अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण तसेच इतर आरक्षणासंदर्भात न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच हा निकाल जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) माहिती पाठविण्यात येत असल्याचेही आयोगाने कळविले आहे.
MPSC परीक्षेतील प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा
एमपीएससीकडून उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा जाहीर केली आहे. सामान्य प्रवर्गासाठी पुरुषांच्या गुणांची सीमारेषा ११६ गुण, तर महिलांच्या गुणांची सीमारेषा १११ गुण आहे. एससी प्रवर्गात पुरुषांच्या गुणांची सीमारेषा १०९ गुण तर महिलांची १०४ गुण आहे. एसटी प्रवर्गात पुरुष ९९ गुण, तर महिला ९४ गुणांची सीमारेषा निश्चित केली आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात पुरुषांच्या गुणांची सीमारेषा ११६ गुण तर महिलांसाठी १११ गुण आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गात पुरुषांच्या गुणांची सीमारेषा १०३, तर महिलांची ९९.५० गुण आहे. तसेच एसईबीसी प्रवर्गात पुरुषांसाठी गुणांची सीमारेषा ११६ गुण आणि महिलांसाठी १११ गुण अशी गुणांची सीमारेषा जाहीर केली आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेचे (MPSC) वेळापत्रक जाहीर
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२५ च्या निकालानुसार मुख्य परीक्षेसाठी एकूण १३९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेमध्ये अर्हतापात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ ही २९ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रामध्ये होणार आहे. त्यानुसार २९ मार्च रोजी सकाळच्या सत्रात भाषा १ व दुपारच्या सत्रात भाषा २, ५ एप्रिल रोजी निबंध पेपर ३, १८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सामान्य अध्ययन १ पेपर ४ व दुपारच्या सत्रात सामान्य अध्ययन २ पेपर ५ तसेच १९ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सामान्य अध्ययन ३ पेपर ६ व दुपारच्या सत्रात सामान्य अध्ययन ४ पेपर ७ त्यानंतर २६ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात वैकल्पिक विषय पेपर ८ आणि दुपारच्या सत्रात वैकल्पिक विषय पेपर ९ होणार आहे.
अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
- अर्ज करण्याचा कालावधी – २८ फेब्रुवारी ते १४ मार्च
- ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – १४ मार्च
- शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – १६ मार्च
- चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – १७ मार्च



