PG Medical : चार वर्षांमध्ये १० हजार जागा वाढणार

मुंबई :

मागील सहा वर्षापासून देशामध्ये २९ हजार ८० पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढल्या असून, पुढील चार वर्षांमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणखी १० हजार जागा वाढणार आहेत. त्यामुळे देशातील ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची कमतरता कमी करण्यास मदत होण्याबरोबरच पायाभूत सुविधा व प्राध्यापकांच्या संख्या वाढण्यास मदत होऊन वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २०२०–२१ मध्ये ४ हजार ९८३ पदव्युत्तर वैद्यकीय जागांची भर पडली. त्यानंतर २०२१–२२ मध्ये ४ हजार ७०५ जागांची वाढ झाली. २०२२–२३ मध्ये २ हजार ८७४ जागा, २०२३–२४ मध्ये ४ हजार ७१३ जागा, २०२४–२५ मध्ये ४ हजार १८६ आणि २०२५–२६ मध्ये ७ हजार ६१९ नवीन पदव्युत्तर वैद्यकीय जागांची वाढ करण्यात आली आहे. तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणखी १० हजार २३ जागांना मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. या जागांची भर शैक्षणिक वर्ष २०२५–२६ ते २०२८–२९ दरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

एमडी/एमएस जागांची वर्षनिहाय करण्यात येत असलेल्या वाढीमुळे सरकारी व खासगी महाविद्यालयांमधील जागा वाटप कशाप्रकारे होते, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील डॉक्टर-लोकसंख्या गुणोत्तरावर त्याचा परिणाम होतो का?, तसेच देशांतर्गत वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्ये वाढ झाल्याने परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे का? याबाबतच्या संसदीय प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

PG Medical जागावाढीनंतर गुणवत्ता कायम

वाढत्या वैद्यकीय जागांबरोबरच पायाभूत सुविधा व प्राध्यापक वर्गाची संख्या वाढण्यास मदत होऊन ग्रामीण व वंचित भागांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता कमी होत आहे. तसेच उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांतील डॉक्टर-लोकसंख्या गुणोत्तरावरामध्ये असलेली मोठी तफावत कमी होण्यास मदत होत आहे. जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना देशांतर्गत वैद्यकीय प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एनएमसीने किमान मानक आवश्यकता नियम, पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण नियमावली २०२३ (जीएमईआर), वैद्यकीय शिक्षणाच्या मानकांच्या जतनासाठीची नियमावली २०२३ (एमएसएमईआर-२०२३) तसेच कौशल्याधारित वैद्यकीय शिक्षण (सीबीएमई) अभ्यासक्रम मार्गदर्शक तत्त्वे २०२४ अधिसूचित केली आहेत. या नियमांमुळे देशभरात वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि पारदर्शकता उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : MPSC : निकाल जाहीर; मुख्य परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *