Tukaram Mundhe : सिप्ला औषध कंपनीला तुकाराम मुंढेंचा दणका
पुणे, कोल्हापूरमधील कारवाईत २४.८१ लाखांचा औषधसाठा जप्त
मुंबई :
पतंजलीच्या औषधांवर कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी देशातील आघाडीची कंपनी असलेल्या मेसर्स सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या औषधांवर कारवाई केली. त्यामुळे आता ॲलोपॅथीच्या औषधांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध आणि सुरक्षित महाराष्ट्र’ ही मोहीम हाती घेत अन्न व औषध प्रशासनाने ८ जून रोजी पुणे व कोल्हापूरमध्ये बेकायदा औषध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये २४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर औषधसाठा जप्त करण्यात आला. त्यानुसार पुण्यातील वडकी येथील मेसर्स सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या गोदामाची एफडीएने तपासणी केली. या तपासणीमध्ये ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या सरकारच्या ‘शेड्युल्ड एच’अंतर्गत येणाऱ्या औषधाच्या वेष्टनावर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ औषधाचा ११ लाख १९ हजार किमतीचा साठा जप्त केला. सिप्लासारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गोदामावर एफडीएने छापा टाकल्याने नियमाचे भंग करणाऱ्या औषध उत्पादक कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Tukaram Mundhe : परवान्याशिवाय औषधसाठा जप्त
८ जून २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाने कोल्हापूरमधील रविवार पेठ येथे मेसर्स मेडटॅब्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेडवर धाड टाकली. तपासामध्ये प्रतिजैविक इंजेक्शन्स आणि ॲलोपॅथिक औषधाांचा साठा आढळला. या औषधांच्या खरेदी-विक्रीबाबत आवश्यक परवाने व कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे औषधांचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित २९ प्रकारच्या औषधांचा १३ लाख ६२ हजार १४७ रुपयांचा साठा जप्त केला.



