Ganeshotsav : सलग चौथ्या वर्षी फुलांच्या निर्माल्यातून घडवला ‘कोपरखैरणेचा इच्छापूर्ती’
मुंबई :
कोपरखैरणे येथील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने आपल्या रौप्यमहोत्सवी अर्थात २५व्या वर्षानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी एक आगळीवेगळी संकल्पना साकारली आहे. यंदा मंडळाचा लाडका ‘कोपरखैरणेचा इच्छापूर्ती’ संपूर्णपणे फुलांच्या निर्माल्यातून घडवण्यात आला असून, या उपक्रमातून ‘एकात्मतेचा उत्सव’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मंडळाने सलग चौथ्या वर्षी केवळ फुलांच्या निर्माल्यापासून गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वसा जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातही अशा स्वरूपाचा पहिलाच प्रयोग असल्याचा मंडळाचा दावा आहे.

यंदाच्या संकल्पनेत मुंबई आणि नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये भक्तांनी अर्पण केलेले फुलांचे निर्माल्य एकत्रित करण्यात आले. विविध मंडळांतील आणि असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या पवित्र फुलांपासून २५व्या वर्षाची ‘इच्छापूर्ती बाप्पा’ मूर्ती साकारण्यात आली आहे. त्यामुळे विविध मंडळांची भक्ती आणि भावभावना एका मूर्तीत एकवटल्याने हा उपक्रम ‘एकात्मतेचा उत्सव’ ठरला आहे.
या संकल्पनेमागे २०२५ च्या गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचा भक्कम पाया आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून, स्थानिक नागरिकांकडून, नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी)च्या निर्माल्य कलशांमधून तसेच विविध गणपती मंदिरांमधून मोठ्या प्रमाणावर फुलांचे निर्माल्य संकलित करण्यात आले. यामध्ये मंडळाकडूनच सुमारे ३०० ते ४०० किलो निर्माल्य जमा करण्यात आले, तर इतर मंडळे, नागरिक, मंदिरे आणि एनएमएमसीच्या माध्यमातून उर्वरित निर्माल्य संकलित करून एकूण सुमारे १ टन फुलांचे निर्माल्य जमा करण्यात आले.

संकलित निर्माल्यावर १००-१०० किलोच्या टप्प्यांमध्ये प्रक्रिया करण्यात आली. यासाठी डिहायड्रेशन (Dehydration) तंत्रज्ञान आणि नैसर्गिकरीत्या उन्हात सुकवण्याची पद्धत वापरण्यात आली. या पर्यावरणपूरक प्रक्रियेनंतर सुमारे २०० ते २५० किलो शुद्ध फुलांची पावडर तयार झाली. याच पावडरपासून यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील बाप्पा मूर्ती साकारण्यात आली.
गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या निर्माल्याची शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. एरवी पाण्यात विसर्जित होणाऱ्या फुलांना नवजीवन देत त्यातून पुन्हा एकदा ईश्वरी स्वरूप साकारण्यात आले आहे. जलप्रदूषण रोखण्याबरोबरच संसाधनांच्या पुनर्वापराचे महत्त्व अधोरेखित करत ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेच्या पुढे जात ‘निर्माल्यातून नवनिर्माण’ हा प्रभावी संदेश मोरया मंडळाने दिला आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकात्मता आणि भक्तीभाव यांचा अनोखा संगम घडवून आणत मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने गणेशोत्सवाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.



