ITI Admission : यंदा आयटीआयच्या जागांमध्ये वाढ
नाशिक, अमरावती व मुंबईतील सरकारी संस्थांच्या जागेत घट
मुंबई :
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया २१ मे पासून सुरू होत आहे. यंदा आयटीआयच्या जागांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ७ हजार ४ जागांची वाढ झाल्याने यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १ लाख ५७ हजार ६६४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र सरकारी संस्थांच्या तुलनेत खासगी संस्थांमध्ये ही वाढ अधिक आहे. त्याचबरोबर नाशिक, अमरावती व मुंबई या विभागामध्ये खासगी संस्थांच्या जागांमध्ये वाढ झाली असली तरी सरकारी संस्थांच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. राज्यामध्ये जागांमध्ये झालेल्या वाढीमध्ये पुणे विभागात सर्वाधिक २ हजार ४१६ जागांची वाढ झाली आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयमध्ये वाढविण्यात आलेल्या जागांमध्ये खासगी संस्थांमध्ये ६ हजार ८५२ इतक्या जागा वाढल्या आहेत. तर सरकारी संस्थांमध्ये पुणे, नागपूर व छत्रपती संभाजी नगर या तीन विभागांमध्ये फक्त ९१६ जागा वाढल्या आहेत तर नाशिक, अमरावती व मुंबई या विभागामध्ये ७६४ जागा कमी झाल्या आहेत. आयटीआयमध्ये वाढलेल्या ७ हजार ४ जागांमध्ये पुणे विभागातून सर्वाधिक २ हजार ४१६ इतक्या जागा वाढल्या आहेत. यामध्ये सरकारी संस्थांमध्ये ४४४ तर खासगी संस्थांमध्ये १ हजार ९७२ जागांचा समावेश आहे.
पुणे विभागानंतर नागपूर विभागामध्ये १ हजार ९४८ जागा वाढल्या आहेत. यामध्ये खासगी संस्थांमध्ये १ हजार ५२४ तर सरकारी संस्थांमध्ये ४२४ जागा आहेत. नाशिक विभागात वाढ झालेल्या १ हजार ९०० जागांमध्ये खासगी संस्थांमध्ये २ हजार ११२ जागा वाढल्या आहेत. मात्र त्याचवेळी सरकारी संस्थांमध्ये २१२ जागांची घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ६३६ जागा वाढल्या असून, यामध्ये खासगी ५८८ तर सरकारी ४८ जागांचा समावेश आहे. अमरावती विभागात खासगी संस्थेमध्ये २६४ जागा वाढल्या असल्या तरी सरकारी संस्थेमधील १८४ जागा कमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई विभागामध्येही खासगी संस्थेमध्ये ३९२ जागा वाढल्या असताना सरकारी संस्थांमध्ये ३६८ जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक, अमरावती व मुंबई विभागामध्ये खासगी संस्थांमध्ये वाढ झाली असली तरी सरकारी संस्थांमधील जागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे या विभागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
ITI : एका संस्थेची वाढ
राज्यात यंदा सरकारी आयटीआय संस्थांची संख्या ४१८ इतकी कायम असली, तरी खासगी आयटीआय संस्थांमध्ये एका संस्थेची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात एकूण १ हजार ३ आयटीआय संस्था होत्या. यंदा ही संख्या १ हजार ४ वर पोहोचली आहे.



