Blood Shortage : मुंबईतील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा
मुंबई :
मुंबईतील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक गटाचे रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासकीय रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने थॅलेसेमिया रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्ताच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

एप्रिलमध्ये परीक्षा आणि मेमध्ये उन्हाळी सुटीमुळे गावी जाण्याकडे नागरिकांचा असलेला कल यामुळे या दोन महिन्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांकडील रक्ताचा साठा कमी होऊन दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. यंदा राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून मुंबईमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात सरकारी रुग्णालयांमध्ये फारच कमी रक्तसाठा उपलब्ध आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या A+ या गटाचे रक्तही अनेक शासकीय रुग्णालयात उपलब्ध नाही.
Blood Stock : रुग्णालयांमध्ये उपलब्ध रक्तसाठा
केईएम रुग्णालयात सध्या केवळ ६५ पिशव्या इतका रक्तसाठा उपलब्ध असून त्यांना दररोजची सुमारे १०० ते १२९ पिशव्या इतक्या रक्ताची आवश्यकता आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयात केवळ ४ पिशव्या रक्त उपलब्ध असून तेथे दररोजची १० ते १५ रक्त पिशव्यांची गरज आहे. तसेच या रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांसाठी केंद्र असल्याने येथे जवळपास १०० थॅलेसेमिया रुग्ण रक्तासाठी येतात. राजावाडी रुग्णालयामध्ये ४६ पिशव्याच उपलब्ध आहेत. या रुग्णालयात डीएनबी अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून रक्ताची गरज वाढली आहे.
तसेच इंडियन रेड क्रॉस (३ पिशव्या), जे.जे. रुग्णालय रक्तपेढी (४४ पिशव्या), जी.टी. रुग्णालय (२० पिशव्या), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (कांदिवली शताब्दी) (१३ पिशव्या), कामा रुग्णालय (२१ पिशव्या) आणि वांद्रे भाभा रुग्णालयांमध्ये १६ पिशव्या इतके रक्त उपलब्ध आहे. रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण आणि थॅलेसेमिया रुग्णांना हा रक्ताचा साठा फारच अपुरा असल्याचे बोलले जात आहे.
थॅलेसेमियाच्या रुग्णांवर गंभीर परिणामाची शक्यता
थॅलेसेमिया, सिकलसेल या सारख्या आजारांने ग्रस्त असलेल्या रुग्णांना १५ ते २० दिवसांनी सातत्याने रक्त द्यावे लागते. रक्तसाठ्यातील ही घट कायम राहिल्यास आपत्कालीन रुग्णसेवा आणि थॅलेसेमिया रुग्णांच्या उपचारांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे म्हणणे
मुंबईमध्ये सध्या रक्ताचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. सध्याच्या घडीला राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये ३५ हजार ९४२ तर मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये ५ हजार ११० इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईच्या रक्तपेढ्यांमध्ये असलेला रक्तसाठा हा पुरेसा आहे. रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.



