Rising heat : वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या सत्रात शाळा नको
उकाड्याने विद्यार्थी-पालक त्रस्त; सकाळच्या शाळांसाठी जोरदार मागणी
मुंबई :
राज्यातील तापमानात सातत्याने होणारी वाढ आणि पावसाचे लांबलेले आगमन यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच १५ जूनपासून विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यावर व दुपारच्या सत्राची शाळा भरताना विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांकडून पुढील १५ दिवस दुपारऐवजी फक्त सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी करण्यात येत आहे. शिक्षक संघटनांनीही या मागणीला लावून धरत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र पाठवले आहे.

दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळांचे वेळापत्रक बदलून सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असून जूनच्या मध्यावरही राज्यातील अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्यासारखी तीव्र उष्णता, दमट वातावरण तसेच पाणीटंचाईची समस्या कायम आहे. सध्याही उष्णतेची तीव्रता कायम असताना विद्यार्थ्यांना दिवसभर या वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक शाळांमध्ये लोखंडी पत्र्यांच्या वर्गखोल्या, अपुरा वीजपुरवठा तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः डोंगरदऱ्यांतील वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये स्वच्छतागृहासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक बिकट हाेण्याची शक्यता आहे.
Rising heat : शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्याची गरज
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन परिस्थितीनुसार शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्याची गरज असल्याचे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे. हवामानात सुधारणा होईपर्यंत सकाळच्या सत्राचा पर्याय स्वीकारल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो, असेही पालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मागणीला विविध शिक्षक संघटनांनीही पाठिंबा देत थेट शालेय शिक्षणमंत्र्यांना विनंतीपत्र लिहिले आहे.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्त्वाची असल्याने विदर्भ वगळता राज्यातील शाळा किमान पुढील १५ दिवस सकाळच्या सत्रात भरविण्याचा संवेदनशील निर्णय शासनाने घ्यावा, असे ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे राज्य संयोजक भाऊ चासकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही भागांत पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली, तरी उष्णतेची तीव्रता कमी होईपर्यंत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.



