Rojgar Mahakumbh : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी–सृजन ट्रस्टमध्ये करार

युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी; शासन–उद्योग–सामाजिक संस्थांचा समन्वित पुढाकार

मुंबई :

राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्हा, तालुका आणि स्थानिक परिसरात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नवी बळकटी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सृजन ट्रस्ट, पुणे यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सामंजस्य करार - voice of eastern
सामंजस्य करार

येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार महाकुंभाची व्याप्ती वाढविणे, विविध उद्योग व आस्थापनांचा सहभाग वाढविणे आणि जास्तीत जास्त रोजगार इच्छुक युवकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत राज्यभर विविध ठिकाणी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार असून, रोजगार इच्छुक युवक आणि नोकरी देणाऱ्या कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. मेळाव्यांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, शक्य तेथे निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर किंवा नियुक्तीपत्र देण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

विविध उद्योग, कंपन्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स तसेच सेवा क्षेत्रातील संस्थांना या उपक्रमाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. उपलब्ध रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव, कामाचे ठिकाण आणि अपेक्षित भरतीची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय व कौशल्य प्रशिक्षणार्थी, पदवीधर, पदविकाधारक तसेच इतर रोजगार इच्छुक युवकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी शैक्षणिक संस्था, युवा संघटना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. महिला, दिव्यांग, ग्रामीण युवक आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यांच्या प्रभावी आयोजनासाठी उमेदवार नोंदणी, कंपन्यांसाठी हेल्प डेस्क, मुलाखत व्यवस्था, गर्दी व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांच्या जॉईनिंग स्टेटसचा पाठपुरावा करून या उपक्रमातून प्रत्यक्ष किती युवकांना रोजगार मिळाला, याचे परिणामाधारित मूल्यमापनही करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Padmini Premier : ६० वर्षांनंतर पद्मिनी प्रीमिअरची होणार एसआयटी चौकशी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त अमित सैनी, सृजन ट्रस्टचे विश्वस्त प्रा. मिलिंद मराठे, दिपक मुकादम, प्रा. वैद्य कैलास सोनमनकर, विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक, अमित पटले, श्रेयस जोगळेकर, अलका यादव आदींच्या उपस्थितीत करार झाला.

Rojgar Mahakumbh : राज्यातील लाखो युवकांसाठी सुवर्णसंधी!

राज्यातील युवकांना केवळ रोजगाराची माहिती नव्हे, तर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’च्या माध्यमातून युवक, उद्योग आणि उद्योग व आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणले जात आहे. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नातून हा उपक्रम राज्यातील लाखो युवकांसाठी नवी संधी निर्माण करेल.
– मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत