मुंबईतील ESIS रुग्णालयामध्ये प्रथमच डायलिसिस सुविधा
मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त नागरिकांना मिळणार दिलासा

मुंबई :
मागील काही वर्षांपासून मूत्रपिंड विकाराने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, काही रुग्णांना रक्तशुद्धीकरणाची आवश्यकता भासत आहे. ही बाब लक्षात घेता कर्मचारी राज्य विमा महामंडळांतर्गत (ईएसआयसी) असलेल्या कांदिवली येथील ईएसआयएस रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील पाच ईएसआयएस रुग्णालयांपैकी या रुग्णालयामध्ये प्रथमच ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ईएसआयएस रुग्णालयामध्ये साधारणपणे राज्य विमा योजनेशी संलग्न कामगार आणि महात्मा ज्योतिबा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत असलेले रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरणाची सुविधा नसल्याने रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयामध्ये पाठविण्यात येत असे. त्यामुळे विमा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असे. ही बाब लक्षात घेत महामंडळामार्फत कांदिवली रुग्णालयामध्ये सहा खाटांचे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ५ ऑक्टोबरपासून हे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. रक्तशुद्धीकरण केंद्रातील सहा यंत्रापैकी चार यंत्र ही नियमित रुग्णांसाठी असून, एक यंत्र एचआयव्ही रुग्ण, एक यंत्र अत्यावश्यक रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. रक्तशुद्धीकरण केंद्रांच्या पहिल्या दिवशी तीन रुग्णांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती कांदिवली ईएसआयएस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद देवळे यांनी दिली.
ESIS Hospital : सध्याच्या घडीला २२ रुग्णांची नोंद झाली
कांदिवली ईएसआयएस रुग्णालयामध्ये सध्याच्या घडीला २२ रुग्णांची नोंद झाली असून, यामध्ये काही रुग्ण हे ईएसआयएसचे असून, काही रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घेत असलेले आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णांना रक्तशुद्धीकरणासाठी वेळ देण्यात येणार असून, अत्यावश्यक स्थितीमध्ये आलेल्या रुग्णासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रक्तशुद्धीकरण झालेल्या रुग्णांच्या विश्रांतीसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना रक्तशुद्धीकरण केल्यानंतर काहीवेळ विश्रांती करता येणार असल्याची माहिती कांदिवली ईएसआयएस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद देवळे यांनी दिली.
कांदिवली ईएसआयएस रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याने याचा फायदा अंधेरीपासून मिरा-भाईंदरपर्यंतच्या रुग्णांना होण्याची शक्यता आहे. तसेच वसई व विरारमधील रुग्णांनाही काही प्रमाणात याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ईएसआयसी रुग्णालयामध्ये रुग्णांना ही सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येणार असल्याने रुग्णांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.



