wrestling : नरसिंह यादव दंगल लीग’चे विजेतेपद महाराष्ट्राकडे

मुंबई : 

मुंबईत पार पडलेल्या ‘नरसिंह यादव दंगल लीग’ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दमदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते नरसिंह यादव यांच्या पुढाकारातून नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला परिसरातील विलासराव देशमुख मैदानावर झालेल्या या एकदिवसीय लीगमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या चार पारंपरिक बलाढ्य राज्यांचे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघात ५ पुरुष आणि २ महिला कुस्तीपटू अशा सात खेळाडूंचा समावेश होता. एकूण २८ कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या पहिल्या लढतीत हरियाणा आणि पंजाब आमनेसामने आले. चुरशीच्या सामन्यात हरियाणाच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत सामना जिंकला. त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश या सामन्यात दोन्ही संघांत तगडी झुंज पाहायला मिळाली; मात्र महाराष्ट्राने आघाडी घेत विजय मिळवला.

wrestling final : महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात लढत झाली

अंतिम फेरीत महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात विजेतेपदासाठी लढत झाली. महाराष्ट्राच्या पृथ्वीराज पाटील, रविराज चव्हाण, आदर्श पाटील, अमृता पूजारी आणि सोनाली मंडलिक यांनी आपापल्या गटात विजय मिळवत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. हरियाणाकडून अंकुश सागर दहिया आणि कुसुम दहिया यांनी विजय मिळवला, तरी अंतिम निकाल ५–२ असा महाराष्ट्राच्या बाजूने लागला.

स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आमदार अतुल भातळखर, आमदार संजय उपाध्याय, उद्योगपती काझी अब्दुल मतीन, संपत साळुंखे आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. अभिनेते मुकेश ऋषी यांनीही उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

आयोजक नरसिंह यादव यांनी सांगितले की, अशा लीग स्पर्धांमुळे देशात कुस्तीला नवे व्यासपीठ मिळेल आणि नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध होईल. विजेत्या महाराष्ट्र संघाला चांदीची गदा आणि स्पर्धेची मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिकेही देण्यात आली.

हेही वाचा : Kho-Kho : कुरुक्षेत्रवर महाराष्ट्राची धमाकेदार सुरुवात

रोमहर्षक लढती, प्रेक्षकांचा उत्साह आणि खेळाडूंची जिद्द यामुळे ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी संस्मरणीय ठरली. महाराष्ट्र संघाने एकत्रित संघभावना आणि कौशल्याच्या जोरावर विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *