BMC Budget : शिक्षण विभागाचे ‘मिशन सफल’

मुंबई :

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मिशन संपूर्ण’ अंतर्गत सहशालेय उपक्रमांस चालना देण्याकरीता नवीन शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करुन मिशन ‘सफल’ राबविण्यात येणार आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्षात शारीरिक शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय छात्रसेना हा उपक्रम सुरु करण्याचे नियोजित आहे. यासाठी महानगरपालिकेच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीसी पथकाची नोंद एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक यांच्याकडे करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व क्षेत्रांचा विचार करुन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून ‘मिशन संपूर्ण’ राबविण्यात येत आहे. आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मिशन संपूर्ण’ अंतर्गत सहशालेय उपक्रमांस चालना देण्याकरीता आवश्यकतेनुसार नवीन शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करुन मिशन ‘सफल’ राबविण्यात येणार आहे. ‘सफल’ मिशनमधील एस म्हणजे स्ट्रेंग्थ (फिजिकल) या अंतर्गत राष्ट्रीय छात्रसेना उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाते. तसेच सामुदायिक सेवेद्वारे शिस्त, नेतृत्व आणि देशभक्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ए- ऍक्टिव्हिटी (स्काऊट -गाईड) यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शील संवर्धन, आरोग्य, हस्त व्यवसाय आणि सेवा या चतुःसूत्री वर आधारित अभ्यासक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार स्काऊट गाईड विभागामार्फत राज्य व राष्ट्रपती पुरस्कार उपक्रमांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तर ‘एफ’ फुतुरिस्टिक (म्युझिक) यामध्ये संगीत व कला अकादमीमार्फत संगीत विभागाच्या संगीत सप्ताह व संगीत स्पर्धा या शैक्षणिक व कलात्मक उपक्रमांतर्गत महानगरपालिका शालेय विद्यार्थ्यांच्या सांगीतिक कलागुणांना वाव मिळतो. तसेच त्यांना मोठ्या रंगमंचावर आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होते. या क्षेत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना पारंगत करण्याकरीता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ए- अम्बिशन (आर्ट) यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कलागुण व सौंदर्य दृष्टीकोन विकसित होण्यासाठी किमान १५० शाळांमध्ये कलावर्गाची निर्मिती करुन त्या माध्यमातून चित्रकलेची आवड असलेल्या निवडक विद्यार्थ्यांना कला विषयक साहित्य पुरवून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल.

हेही वाचा : BMC Budget : आरोग्य अर्थसंकल्पामध्ये २२ टक्क्यांनी वाढ

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांना प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता विशेष वर्ग आयोजित करण्यात येतील. कलेचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी ३ कला उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच एल – अर्थात कार्यानुभव विषयाचा पाया कृती केंद्रीत शिक्षणावर आधारित आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कौशल्यात्मक अंगाचा समतोल विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना कौशल्य पुरक उपक्रमांद्वारे विविध समाजोपयोगी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *