TB Day : गतवर्षीच्या तुलनेत मुंबईत क्षयराेग रुग्णांमध्ये घट
औषध प्रति रोधक क्षयरोगाचे रुग्ण बरे होण्याचा दर ८ वर्षात ८१ टक्क्यांपर्यंत पोहचला
मुंबई :
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ मध्ये ‘क्षयरोग मुक्त भारत अभियान’ हाती घेतले आहे. त्यानुसार क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार पद्धती आणि सातत्यपूर्ण रुग्ण सहाय्य व पाठपुरावा करण्यात येतो. परिणामी २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये क्षयरोग रुग्णांच्या संख्येत ४ हजार ८०३ रुग्णांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे (डीआरटीबी) रुग्ण बरे होण्याचा दर आठ वर्षांत दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रुग्ण शोधण्यासाठी विविध आरोग्य संस्थांमार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२५ मध्ये मुंबईमध्ये ५४ हजार ३९० क्षयरोग रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी ४८ हजार ८३५ रुग्ण मुंबईतील रहिवासी होते. त्याचप्रमाणे २०२४ मध्ये ६० हजार ६३३ क्षयरोगाचे रुग्ण आढळले, त्यापैकी ५३ हजार ६३८ क्षयरोगाचे रुग्ण मुंबईतील रहिवासी होते. यावरून मागील दोन वर्षांमध्ये मुंबईमध्ये सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत ६ हजार २४३ इतक्या रुग्णांची घट झाली असून, प्रत्यक्षात मुंबईतील रहिवासी रुग्णांच्या संख्येमध्ये ४ हजार ८०३ रुग्णांनी घट झाली. मागील दोन वर्षांमध्ये क्षयरोग रुग्णांमधील औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. २०२४ मध्ये ९ टक्के रुग्ण सापडले होते. २०२५ मध्ये हे प्रमाण ८ टक्क्यांवर आले आहे. त्याचप्रमाणे २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये फुफ्फुसाव्यतिरिक्त म्हणजे मेंदू, हाडे, लसिकाग्रंथी अशा विविध अवयवांना होणाऱ्या क्षयरोगाच्या प्रमाणात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये फुफ्फुसांव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्णांचे प्रमाण ३८ टक्के होते, तर २०२५ मध्ये हे प्रमाण ४० टक्के इतके झाले आहे. मात्र बालरुग्णांचे प्रमाण हे ६ टक्के इतके कायम आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने निदान सेवेमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणा, नवीन औषध उपचार पद्धती आणि डीआरटीबी रुग्णांना केलेल्या मार्गदर्शन व सहाय्यामुळे औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांचा यशाचा दर ८० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मागील आठ वर्षांत उपचारांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
विविध माध्यमातून TB रुग्णांची तपासणी
क्षयरोग नियंत्रणासाठी क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत २०२५ मध्ये १३ लाख ८ हजार २०० संवेदनशील लोकसंख्येची तपासणी केली. त्यापैकी १ लाख २४ हजार ७७४ संशयित रुग्णांचे क्ष-किरण केले. ‘रुग्णानुसार वेगवेगळी क्षयरोग उपचार सेवे’अंतर्गत १९ हजार १७२ रुग्णांची नोंदणी केली. प्रगत बीपाल-एम उपचार पद्धतीद्वारे डिसेंबर २०२५ पर्यंत १ हजार ९३ रुग्णांवर उपचार केले. त्यातील ८९ रुग्णांनी उपचार पूर्ण केले. मुंबईतील विविध रुग्णालयांमधील हँडहेल्ड क्ष किरण यंत्राद्वारे २०२५-२०२६ मधे एकूण ७४ हजार ३०७ रुग्णांचे क्ष किरण काढण्यात आले. लक्षणे नसतानाही संसर्ग ओळखण्यासाठी केल्या जाणाऱ्या सीवाय-टीबी चाचणीद्वारे २०२५ मध्ये १३ हजार ३११ व्यक्तींची तपासणी केली, त्यापैकी १ हजार ९६१ बाधित आढळले व १ हजार ६५५ जणांना प्रतिबंधात्मक उपचार दिले.



