CBSE Result : ९३.७० टक्के; मुलींची पुन्हा बाजी मारली
मुंबई :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यंदापासून ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरण लागू केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी अतिरिक्त परीक्षा देता येणार आहे. या धर्तीवर सीबीएसई मंडळाने १५ एप्रिल रोजी दहावीच्या पहिल्या परीक्षेचा निकाल दुपारी ४ वाजता जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल ९३.७० टक्के इतका लागला आहे. या परीक्षेमध्येही पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९९ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.६० टक्के इतके आहे.

सीबीएसईमार्फत यंदा १७ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान इयत्ता १० वीची परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा सर्व दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत एकाच सत्रात घेण्यात आली. या परीक्षेला देशभरातून २४ लाख ७१ हजार ७७७ विद्यार्थी बसले होते. त्यातील २३ लाख १६ हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालामध्ये ०.०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या ९३.६६ टक्के इतका निकाल लागला होता. परीक्षेमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय सीबीएसईने यंदाही कायम ठेवला आहे. मात्र संबंधित विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र जारी करण्यात येणार आहे.
उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण
सीबीएसईच्या आकडेवारीनुसार, या परीक्षेमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २.२४ टक्के इतकी आहे. तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८.९६ टक्के इतके आहे. विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय यश मिळवले आहे. एकूण ९ हजार ४४३ विद्यार्थ्यांपैकी ९ हजा ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विशेष गरजा असलेल्या या विद्यार्थ्यांचा निकाल ९६.२४ टक्के इतका लागला आहे. यातील ४५२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त तर ९१ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
केंद्रीय विद्यालय आघाडीवर
सीबीएसईच्या दहावीच्या निकालामध्ये केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक लागला आहे. केंद्रीय विद्यालयांचा निकाल ९९.५७ टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल ९९.४२ टक्के, संलग्नित खासगी शाळांचा निकाल ९३.७७ टक्के, सरकारी शाळांचा निकाल ९१.४३ टक्के आणि अनुदानित शाळांचा निकाल ९१.०१ टक्के इतका लागला आहे. त्याचप्रमाणे सीबीएसईच्या परदेशामध्ये असलेल्या शाळांचा निकालही ९९.१० टक्के इतका लागला आहे. गतवर्षी परदेशातील शाळांचा निकाल हा ९८.५७ टक्के इतका लागला हाेता.
CBSE : विभागनिहाय निकाल
सीबीएसईच्या निकालामध्ये विभागनिहाय तिरुवनंतपुरम व विजयवाडा विभागाचा निकाला सर्वाधिक ९९.७९ टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल चेन्नई विभागाचा निकाल ९९.५८ टक्के, बेंगळूर विभागाचा ९८.९१ टक्के, दिल्ली पश्चिम विभागाचा निकाल ९७.४५ टक्के, दिल्ली पूर्व विभागाचा निकाल ९७.३३ टक्के, पुणे विभागाचा ९६.६६ टक्के, अहमदाबाद ९६.६१ टक्के तर गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वात कमी ८५.३२ टक्के इतका लागला.
दुसऱ्या बोर्ड परीक्षेची संधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सीबीएसईने लागू केलेल्या ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरणानुसार विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी अतिरिक्त परीक्षा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. दुसऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना फक्त तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांची यादी शाळांमार्फत पाठवली जाणार असून विषय बदलाची परवानगी दिली जाणार नाही.
CBSE निकाल कसा पाहावा?
सीबीएसईमार्फत यंदा १७ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान इयत्ता १० वीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून सुमारे २५ लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी cbse.gov.in, results.cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळांसह UMANG App आणि DigiLocker या प्लॅटफॉर्मचा वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यामध्ये परीक्षा क्रमांक, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र, जन्मतारीख, सिक्युरिटी पिन ही माहिती भरून सबमिट बटण क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्कशीट उपलब्ध होणार आहे.



