Nanavati Hospital : जन्मतः अंगठा नसलेल्या चिमुकलीवर यशस्वी ‘टो-टू-हँड’ सर्जरी
दुर्मिळ सर्जरीद्वारे हाताला जोडले पायाचे बोट
मुंबई –
मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी’द्वारे एक अद्भूत कामगिरी केली आहे. नागपूरमधील अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही मुलगी जन्मली तेव्हा तिच्या डाव्या हाताला अंगठा नव्हता आणि उजव्या हाताचा अंगठा अत्यंत अविकसित स्थितीत होता. नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या दोन टप्प्यांतील शस्त्रक्रियेमुळे या चिमुकलीला आता सामान्य व्यक्तीप्रमाणे हाताचा वापर करता येईल. या यशस्वी उपचारामुळे तिला भविष्यात कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी आयुष्य जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.
ही मुलगी जन्मली तेव्हा तिला डावा अंगठा नव्हता, तर उजव्या हाताचा अंगठा हाड आणि स्नायू नसल्यामुळे अत्यंत अविकसित होता. यामुळे तिला वस्तू पकडणे किंवा हाताने इतर हालचाली करणे अशा जीवनावश्यक कौशल्यांमध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. या संदर्भातील उपचारांविषयी सखोल चौकशी केल्यावर, या कुटुंबाला नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘प्लास्टिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि हँड ट्रान्सप्लांटेशन’ विभागाचे संचालक डॉ. निलेश सातभाई यांच्या कौशल्याबद्दल समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने डॉ. सातभाई यांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.
Nanavati : पश्चिम भारतातील मोजक्याच केंद्रांमध्ये अशा शस्त्रक्रिया
बालवयातील शारीरिक विकासाचे महत्त्वाचे टप्पे लक्षात घेऊन, डॉ. सातभाई आणि त्यांच्या पथकाने अनेक टप्प्यांत शस्त्रक्रियेचे नियोजन केले. त्यांनी प्रथम उजव्या हाताच्या अंगठ्याचे सांधे स्थिर करून तो दुरुस्त केला आणि तळहातातील एक स्नायू तिथे प्रत्यारोपित केला, जेणेकरून अंगठ्याची हालचाल आणि इतर बोटांना स्पर्श करणे (अपोझिशन) शक्य होईल. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, मुलीच्या हाताला आधार देण्यासाठी ‘स्प्लिंट’ लावण्यात आले आणि ६ ते ८ आठवड्यांतच तिने उजव्या अंगठ्याचा प्रभावी वापर सुरू केला. एक अंगठा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे, चिमुकलीला हाताचा वापर करणे अधिक सोपे झाले. दोन महिन्यांनंतर, डॉ. सातभाई यांनी शस्त्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण केला. या टप्प्यात, डाव्या हाताचा नसलेला अंगठा पुन्हा तयार करण्यासाठी डॉक्टरांनी अत्यंत विशेष अशी ‘मायक्रोव्हस्क्युलर टो-टू-हँड ट्रान्सफर’ (पायाचे बोट हाताला जोडणे) ही शस्त्रक्रिया केली. पश्चिम भारतातील मोजक्याच केंद्रांमध्ये अशा प्रगत प्रक्रिया केल्या जातात. डॉ. सातभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलीच्या डाव्या पायाचे दुसरे बोट त्यातील टेन्डन्स, नसा आणि रक्तवाहिन्यांसह हाताला जोडले. रक्ताभिसरण, संवेदना आणि कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी या सर्व संरचनेत अत्यंत काळजीपूर्वक दुरुस्ती करण्यात आली. यासोबतच, पायाचे कार्य सामान्य राहावे यासाठी जिथून बोट काढले त्या पायाची देखील पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रचना केलेल्या अंगठ्याची जखम चार ते सहा आठवड्यांत भरून येईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर, हाताची ताकद, हालचाल आणि मज्जासंस्थेशी संबंधित समन्वय (neural adaptation) वाढवण्यासाठी नियोजित फिजिओथेरपी दिली जाईल.

मानवी हालचालींमध्ये अंगठ्याचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. सातभाई म्हणाले, “एकटा अंगठा हाताच्या एकूण कार्यामध्ये ४० टक्क्यांहून अधिक योगदान देतो. त्याच्या हालचालीमुळेच मानवाला गुंतागुंतीची कामे करणे शक्य होते. ‘थंब अप्लासिया’ सारखे आजार दुर्मिळ असले—जे लाखात एका मुलाला होतात—तरी वेळेवर उपचार न मिळाल्यास यामुळे आयुष्यभराचे अपंगत्व येऊ शकते.”
हातांच्या जन्मजात विकृतींवर मात करण्यासाठी वेळेवर निदान
शस्त्रक्रियेनंतरच्या रिहॅबिलिटेशनचे महत्त्व सांगताना डॉ. सातभाई पुढे म्हणाले, “खरे आव्हान शस्त्रक्रियेनंतर सुरू होते. मेंदूला या नवीन अंगठ्याची ओळख पटण्यासाठी आणि त्याचा वापर शिकण्यासाठी मुलांच्या विशेष प्रशिक्षणाची गरज असते. जर ही शस्त्रक्रिया लहान वयातच केली आणि त्याला फिजिओथेरपीची जोड दिली, तर ही मुले भविष्यात पूर्णपणे सामान्य आयुष्य जगू शकतात. या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया भारतात आजही दुर्मिळ आहेत, कारण त्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे कसब आणि वैद्यकीय कौशल्य मोजक्याच डॉक्टरांकडे आहे. अशा यशस्वी उपचारांमुळे हे सिद्ध झाले आहे की, हातांच्या जन्मजात विकृतींवर मात करण्यासाठी वेळेवर निदान, तज्ञांचे मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारपद्धती खूप मोलाची ठरते.



