SNDT University : विद्यार्थींनींना देणार शेती, पर्यावरणाचे धडे

कचऱ्यापासून करणार सेंद्रिय खताची निर्मिती

मुंबई :

पर्यावरण संरक्षण व स्वच्छता अभियानाला चालना देण्याबरोबर विद्यार्थींनींना शेती व पर्यावरणाचे धडे गिरविता यावेत यासाठी एसएनडीटी विद्यापीठामार्फत ‘संस्कृता निर्मल’ अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विद्यापीठाच्या जुहू परिसरामध्ये कचऱ्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच या खतापासून विद्यार्थींनींना भाजीपाला पिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

एसएनडीटी विद्यापीठामार्फत ‘संस्कृता निर्मल’ अभियान - voice of eastern
एसएनडीटी विद्यापीठामार्फत ‘संस्कृता निर्मल’ अभियान

एसएनडीटी विद्यापीठातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘संस्कृता निर्मल’ अभियानांतर्गत जुहू परिसरामध्ये कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते कोरडा व ओला कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थींनींच्या मनावर कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पात विद्यापीठातील ओला आणि सुका कचरा एकत्र करून त्यातून सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. या खताचा वापर कसा करायचा याचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्ञान व्हावे यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. ही स्पर्धा पर्यावरण दिनी सुरू होईल. या स्पर्धेत विद्यापीठातील प्रत्येक विभागाला आवारातील एक ठरावीक जागा नेमून देण्यात येणार आहे. या जागेवर ‘संस्कृता निर्मल’ खत प्रकल्पातील सेंद्रीय खताचा वापर करून भाजीपाला पिकवायचा आहे.

SNDT : विद्यार्थींनींना मिळणार शेतीचे ज्ञान

प्रत्येक विभाग आणि आवारातील महाविद्यालये यांनी त्यांना हवा तो भाजीपाला या जागेत लावायचा आहे. तो पिकवण्यासाठी सेंद्रीय खताचाच वापर करायचा आहे. भाजी लावणे, त्याची मशागत करणे, निगराणी करणे आदी गोष्टी विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थींनी यांनी एकत्र येऊन करायच्या आहेत. यातून विद्यापीठातील विद्यार्थींनींना शेतीबद्दल तर ज्ञान मिळतेच. त्याच सोबत कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने कशी लावायची, याबाबतही त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त होणार स्पर्धा सुरू

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी होणार आहे. या तीन महिन्यांत विद्यापीठाच्या जुहू आवारात विद्यार्थिनी, शिक्षक यांना मातीत काम करण्याचा अनुभव घेता येईल. तसेच स्पर्धेच्या पारितोषिकाचा विचार करताना सेंद्रीय खत तयार करण्यासाठी कचऱ्याचे नियोजन कसे झाले, कोणत्या विभागाने भाजीपाला पिकवण्यासाठी काय काय केले, पिकवलेल्या भाजीपाल्याची गुणवत्ता कशी आहे, या बाबी विचारात घेतल्या जातील, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचा : Diesel price hike : एसटीला वर्षाला १२४ कोटींचा फटका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *