Mumbai University : तुषार गांधी यांनाही प्रवेशास बंदी
मुंबई –
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमेय आनंदराज आंबेडकर यांना कलिना संकुलामध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी महात्मा गांधी यांचे पणतू असलेले तुषार गांधी यांनाही प्रवेशास मज्जाव केल्याचे समोर आले आहे. तुषार गांधी हे बौद्ध भिक्षू भदंत विमांसा यांच्या सुरू असलेल्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठात आले होते. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावरच थांबवून विद्यापीठ आवारात येण्यास मनाई केली.

विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी राजेश बाळखंडे उर्फ भदंत विमांसा हे २२२ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कलिना संकुलात सत्याग्रह करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी तुषार गांधी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुल येथे गेले होते. मात्र मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले. त्यांना विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. यापूर्वीही प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमेय आनंदराज आंबेडकर यांनीही भदंत विमांसा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही विद्यापीठात आले असता प्रशासनाने प्रवेशद्वारावरच अडवले होते. त्यामुळे प्रशासन बाहेरील व्यक्तींना आंदोलनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.
विद्यापीठे ही मुक्त विचारांची, बौद्धिक देवाणघेवाणीची आणि लोकशाही संवादाची केंद्रे मानली जातात. अशा ठिकाणी शांततामय भेटींवर निर्बंध आणणे हे शैक्षणिक वातावरणाला बाधा आणणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः दीर्घकाळ सुरू असलेल्या सत्याग्रहाकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी संवाद टाळला जात असल्याचा आरोप अधिक बळकट होत आहे. भदंत विमांसा यांच्या आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने संवाद साधणे आवश्यक असून, बाहेरील पाठिंबा रोखून तो मार्ग काढता येणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
भदंत विमांसा यांच्या मागण्या काय?
पाली भाषा विभागाचे जतन व विकास करण्यात यावा, स्वतंत्र पाली भवन बांधण्यात यावे, विभागासाठी योग्य अनुदान देण्यात यावे, अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वसतिगृहाचे नूतनीकरण आणि तिनशे विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्यात यावे.
Mumbai University प्रशासनाचे म्हणणे
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात येणार आहेत, याची कोणतीही पूर्वकल्पना विद्यापीठ प्रशासनास देण्यात आली नव्हती, त्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते कलिना संकुलात येणार आहेत हे विद्यापीठास माहीत असते तर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढे विद्यापीठाचीही बाजू मांडण्यात आली असती. कलिना संकुलात जवळपास ५ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थीही वास्तव्यास आहेत. प्राध्यापक त्यांच्या कुटुंबियांसह या संकुलातील सदनिकांमध्ये वास्तव्यास आहेत. कलिना संकुलात बेकायदेशीररित्या बैठ्या स्वरुपातील आंदोलन करणारे राजेश बलखंडे यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्व संबंधितांना विचारपूस करून प्रवेश दिला जात आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.
हेही वाचा : Mumbai University : कलिना संकुलात ६ इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली


