डम्पिंग ग्राऊंडवर Solar पार्क उभारा, सोलर रुफटॉपचा विस्तार करा – खासदार संजय पाटील

मुंबई : 

मुंबई आणि महाराष्ट्राच्या ऊर्जा भविष्यासंदर्भात केंद्र सरकारला थेट जाब विचारत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत सौरऊर्जा योजनांवर जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही इथे राजकारण करायला आलो नाही, मुंबई आणि महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार आहे, हे स्पष्ट सांगा,” असा थेट सवाल करत त्यांनी केंद्राच्या धोरणांवर बोट ठेवले.

मुंबईसारख्या देशातील सर्वाधिक वीज वापर करणाऱ्या महानगरात केवळ २५ हजारांहून कमी सोलर रुफटॉप बसवण्यात आले असल्याची बाब त्यांनी अधोरेखित करत हा आकडा “नगण्य” असल्याचे स्पष्ट केले. वाढत्या ऊर्जेच्या गरजा आणि पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

डम्पिंग ग्राऊंडवर Solar Park उभारल्यास दुहेरी फायदा

यावेळी त्यांनी ईशान्य मुंबईतील तीन डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा उपस्थित करत, त्या ठिकाणांहून निघणाऱ्या विषारी वायूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर “डम्पिंग ग्राऊंडवर सोलर पार्क उभारल्यास दुहेरी फायदा होईल – प्रदूषण कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीही वाढेल,” असा ठोस प्रस्ताव त्यांनी मांडला.

Solar panel voice of eastern
सोलर पॅनल

तसेच, प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी आणि घरावर सोलर रुफटॉप बसवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस योजना, प्रोत्साहन आणि वेळबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. “मी सरकारी योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, मात्र त्या प्रत्यक्षात कितपत राबवल्या जात आहेत, याची स्पष्ट माहिती हवी,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

एक महिन्यात ४५ हजार ९११ Solar पॅनल बसवले

दरम्यान, या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशातील सौरऊर्जा प्रगतीची आकडेवारी मांडली. देशात दररोज १० हजार सोलर पॅनल बसवण्याचे उद्दिष्ट असून महाराष्ट्रात ९ हजार ९६८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशात सौरऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक होत असून एका महिन्यात ४५ हजार ९११ सोलर पॅनल बसवण्यात आल्यामुळे १६ गीगावॅट ऊर्जा निर्मिती होत असल्याचा दावा त्यांनी केला. पुढील काळात ४० लाख सोलर पॅनल बसवण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : Smart School : आता जिल्हा परिषद शाळाही होणार ‘स्मार्ट’

मात्र, मंत्र्यांच्या या उत्तरावर खासदार संजय दिना पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “संसदेत मांडली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात दिसणारी स्थिती यात मोठी तफावत आहे,” असा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारला वास्तववादी अंमलबजावणीवर भर देण्याचे आवाहन केले. स्वच्छ ऊर्जा, कमी वीजदर आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यावरून आता केंद्र-राज्य संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, मुंबईच्या सौरऊर्जा भविष्यासंदर्भात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *