Gutkha seized : मुंबईमध्ये १३ दिवसांत १५ ठिकाणे १३ लाखांचा गुटखा जप्त

मुंबई :

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १ एप्रिलपासून राज्यातील गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्रा, मावा अशा प्रतिबंधित उत्पादनांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील १ ते १३ एप्रिल या १३ दिवसांच्या कालावधीत मुंबईतील १५ ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १३ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

Gutkha seized :  मालाड, कुर्ला, धारावी, नळबाजार या ठिकाणी कारवाई

मुंबईच्या विविध विभागांमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्रा, मावा अशा प्रतिबंधित उत्पानांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएच्या मुंबई कार्यालयास मिळालेली. या गोपनीय माहितीच्या आधारे १ ते १३ एप्रिल या कालावधीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये धडक कारवाई केली. या कारवाई अंतर्गत मुंबईतील मालाड, कुर्ला, सांताकुझ, भांडुप, धारावी, मुलुंड, नळबाजार, बोरीवली अशा १५ ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. १५ ठिकाणी केलेल्या या कारवाईमध्ये १३ लाख ६९ हजार २९३ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या कारवायांसदर्भात संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई आयुक्त श्रीधर डुबे पाटील व सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार करण्यात आली.

एफडीएचे नागरिकांना आवाहन

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी यासह प्रतिबंधित अन्नपदार्थाचे मानवी शरीरावर होणारे अत्यंत घातक परिणाम किंवा दुष्परिणाम विचारात घेता अन्नपदार्थाचे सेवन न करण्याबाबत तसेच या अन्नपदार्थाच्या सेवनाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.

काय आहे कायदा

१६ जुलै २०२५ च्या आदेशान्वये तंबाखू आणि सुपारी जी एकतर स्वादिष्ट, सुगंधित किंवा कोणत्याही मिश्रकासोबत मिसळलेली आणि गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, मिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, खर्रा, मावा या स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी किंवा ग्राहकाला मिश्रण करण्यास सहजरित्या सुलभ होईल अशा रीतीने विकलेली किंवा वितरित केलेली किंवा आवेष्टीत केलेली याची निर्मिती, साठवण, वितरण, वाहतूक किंवा विक्री यास जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी १६ जुलै २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध केलेला आहे.

हेही वाचा : मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात; पाच MILK भेसळखोरांना अटक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *