NEET-UG re-examination : दोन लाखांहून अधिक कर्मचारी सज्ज
बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी
मुंबई :
नीट यूजी पेपर फुटीप्रकरणानंतर रविवारी होणारी पुनर्परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. या सुरक्षा व्यवस्थेबरोबरच परीक्षा घेण्यासाठी देशभरामध्ये तब्बल दोन लाखांहून अधिक कर्मचारी सज्ज ठेवले आहेत.
देशातील ५५१ शहरे आणि परदेशातील १४ शहरांमध्ये नीट यूजी पुनर्परीक्षा होणार आहे. या परीक्षेला तब्बल २२.७९ लाख विद्यार्थी बसणार आहेत. रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ मिनिटे या वेळेत पेन आणि पेपर (लेखी) पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळे देण्यात येणार असून, या विद्यार्थ्यांना सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा यशस्वी, गैरप्रकारविरहित आणि सुरक्षितरित्या, सुरळीत व्हावी यासाठी एनटीएने विविध यंत्रणांच्या समन्वयातून व्यापक नियोजन केले आहे.
NEET-UG re-examination : बहुस्तरीय सुरक्षा आराखडा तयार
परीक्षेची गोपनीयता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी एनटीएने बहुस्तरीय सुरक्षा आराखडा तयार केला आहे. गोपनीय साहित्याची सीलबंद पद्धतीने वाहतूक, जीपीएस-सुसज्ज वाहनांसह पोलीस बंदोबस्त, सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख आणि त्याचे केंद्रीकृत नियंत्रण कक्षाशी जोडलेले थेट निरीक्षण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी उच्च-संवेदनशीलता असलेल्या मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. तसेच तोतयागिरी रोखण्यासाठी आधार-आधारित बायोमेट्रिक पडताळणीची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांवरही सतत लक्ष ठेवले जात असून अफवा किंवा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर गुन्हे विभाग, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

परीक्षेच्या सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी यासाठी एनटीएने दोन लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये ६७४ शहर समन्वयक, ६ हजार ६६९ निरीक्षक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक यांच्याबरोबरच परीक्षेवेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा, गोपनीय परीक्षा साहित्याची वाहतूक करण्यासाठी विशेष सुरक्षा पथके, परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक तसेच जिल्हा प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.



