Mumbai Universaity : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘विद्यार्थी- कुलगुरू संवाद’ उपक्रमाचे आयोजन
मुंबई :
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांचे निरसन करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून ठरलेल्या ‘विद्यार्थी- कुलगुरू संवाद’ या उपक्रमास पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. मुंबई विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या ‘विद्यार्थी- कुलगुरू संवाद’ या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यावर भर दिला जात असून हा उपक्रम अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय उपक्रम ठरला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘विद्यार्थी- कुलगुरू संवाद’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
या शैक्षणिक वर्षातील पहिल्या ‘विद्यार्थी- कुलगुरू संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या कालावधीत करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन) येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे आणि सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थीकेंद्री, पारदर्शक आणि उत्तरदायी शैक्षणिक प्रशासनावर विशेष भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने ‘एनईपी कनेक्ट’ अंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय समस्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी विविध संवादात्मक उपक्रम राबविले जात आहेत. ‘विद्यार्थी–कुलगुरू संवाद’ हा त्याच ‘एनईपी कनेक्ट’ उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदी, बदल आणि संधी यांची माहिती व जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाला प्राधान्य देत त्यांना जलद, पारदर्शक आणि विद्यार्थीहितैषी सेवा उपलब्ध करून देण्याचा मुंबई विद्यापीठाचा हा प्रयत्न आहे.
Mumbai University : विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण होणार
मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या ‘विद्यार्थी- कुलगुरू संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे निकाल, राखीव निकाल, पुनर्मूल्यांकन, छायांकीत प्रत, गुणपत्रिका, पात्रता आणि पदवी प्रमाणपत्र अशा अनुषंगिक तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्यावर भर दिला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. ‘विद्यार्थी- कुलगुरू संवाद’ कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र आणि तक्रार अर्ज सोबत आणावे असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.



